दोन शतकांची गंथालय चळवळ

– अभिजित हेगशेट्ये
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा एका छोट्याशा कार्यक्रमात संपन्न झाला. रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार, रत्नागिरीतील पहिल्या सत्यशोधक साप्ताहिकाचे माजी संपादक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचे हस्ते श्रीफळ वाढवून नगरवाचनालय इमारत नुतनीकरणाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण. सोबत माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर आणि अनेक मान्यवर वाचक, ग्रंथप्रेमी आणि रत्नागिरीकरांची उपस्थिती होती. या निमित्ताने दोनशे वर्ष पूर्ण होणाऱ्या नगर वाचनालयाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
रत्नागिरी हे सुंसंस्कृत, वैचारिक, साहित्य, नाट्य, संगीत क्षेत्रातील जाणकारांचा वारसा असणारे एक प्रगल्भ संस्कृतीचे शहर मानले जाते. तसा या शहराला लोकमान्य बाळगंगाधर टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पु. ल. देशपांडे, नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर, सेनापती बापट, न्यायमूर्ती खारेघाट, कोकण गांधी आप्पा पटवर्धन, साहित्यिक वि. दा. सावरकर, कुसुमताई अभ्यंकर, नाटककार प्र. ल. मयेकर, नाटककार शेट्ये आदी अनेकांचा सहवास लाभला आहे. नाट्यरसिकांचे शहर हा या शहराचा गौरव गेली अनेक दशके नाट्यकलाकारांनी नोंदला आहे. पूर्वीच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग एकत्रित जिल्ह्याचे जिल्हा केंद्र असणारे रत्नागिरी आणि येथील मध्यवर्ती असणारे नगरवाचनालय हे संपूर्ण महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीचे झळाळते प्रतीक होते.
१९ व्या शतकातील सुरुवातीचा काळ माहितीची देवाणघेवाण, संशोधन, त्यासाठी ज्ञानाचा प्रसार याची सुरुवात महाराष्ट्रात आकार घेत होती. त्यासाठी ग्रंथ हे प्रभावी माध्यम होते. ब्रिटिशांकडून देशात मोफत ग्रंथालय प्रसार सुरु होता. महाराष्ट्रात १८२८ साली नेटीव्ह लायब्ररी स्थापना झाली. यांतील पहिले ग्रंथालय १८२८ मध्ये रत्नागिरी येथे सुरू झाले. नंतर ते काही कारणाने बंद झाले आणि १८३८ मध्ये कर्नल पी. टी. फ्रेच यांने नेटीव्ह जनरल लायब्ररी नाशिक येथे सुरू केली; मात्र १८२८ मध्ये रत्नागिरी येथे महाराष्ट्रातील पहिले ग्रंथालय सुरू होणे हे रत्नागिरीच्या वैचारिक आणि सांस्कृतिक वैभवशाली वाटचालीचा एक दैदीप्यमान इतिहास साक्ष म्हणून उभा आहे.

भारतात तक्षशिला, नालंदा विद्यापीठ आणि तेथील प्रचंड समृद्ध असणारी ग्रंथालयाची परंपरा आहे. या परंपरेचा धागा थेट रत्नागिरीपर्यंत पश्चिम किनाऱ्यापर्यंत आहे हे महत्त्वाचे आहे. आज या दोनशे वर्षांची परंपरा असणारे ग्रंथालय आपले रूप बदलत आहे. अत्यंत अद्ययावत काहीसे डिजिटल नव्या जगाचे रूप आपला दीर्घ इतिहासाची साक्ष ठेऊन विस्तारत आहे, हे फार महत्त्वाचे आहे. रत्नागिरी नगर वाचनालयाचे विद्यमान कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन हे लायब्ररी क्षेत्रातील एक अत्युत्तम असे व्यवस्थापन कार्यकर्ते आहेत. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी वाचक, वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथालयाचे मुख्य घटक असतात. यांना सांभाळणारे व्यवस्थापन ही भूमिका दीपक पटवर्धन यांनी अत्यंत उत्तमरित्या भूषवत नगर वाचनालयाला व्यापक स्वरूप दिले आहे. एक लाखांपेक्षा अधिक पुस्तके हा त्यांचा दस्तावैज आहे. नवा प्रकल्प जवळपास ३.५ कोटींचा आहे; मात्र रत्नागिरी शहर परिसरातील उद्योजक, हितचिंतक आणि राजकीय क्षेत्रातील पटवर्धन आणि त्यांच्या सहकाऱ्यांची थेट मुख्यमंत्र्यापर्यत असणारी पोहोच यामुळे हे आव्हान ते लिलया पार करू शकतील याबद्दल संदेह नाही. आजच्या आ. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ते अधिक स्पष्टही झाले. नगर वाचनालयाची जागा रत्नागिरी नगर पालिकेची दीर्घकालीन कराराची. गतवर्षी हा करार संपला होता, काही विकासप्रेमी नगरसेवकांचे लक्ष या शहराच्या मध्यवर्ती जागेवर होते. ती नगर पालिकेच्या ताब्यात घेत नगर वाचनालयाला हुसकावून लावण्याचा कट ही शिजला; मात्र पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या सृजनशील प्रयत्नामुळे वाचनालयाचा पुढील दीर्घकालीन करार होऊ शकला अधिक २५ लाखांचा निधीही प्राप्त झाला.
दोनशे वर्षांचा कालावधी पाहिलेल्या या ग्रंथालयाने जवळपास ६-७ पिढ्यांचा रत्नागिरीचा इतिहास पाहिला आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून वैचारिक पिढ्या घडविल्या आहेत. माझ्या रत्नागिरीच्या प्रथम प्रवेशात नगर वाचनालयातील पुस्तके हा मोठा आधार होता. अनेकांचा तो आधार राहिला आहे. या वाचनालयाच्या नुतन इमारती सोबत होणाऱ्या सभागृहाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचे निश्चित झाले आहे. ही तर फारच आनंदायी बाब आहे.
“हम पडाव को समझे मंजिल
लक्ष्य हुआ आखोंसे ओझल
वर्तमान के मोहजाल में
आनेवाला कल न भुलाएँ !
आओ फिर से दीया जलाएँ …..!”
या अटलजींच्या कवितांची आठवण या प्रसंगी प्रकर्षाने आली.
“आओ फिर से दिया जलाएँ” हे ऐकताना यदुनाथ थत्ते नेहमी सांगत “अंधार फार झाला पणती जपून ठेवा” या काव्य पंक्तींची आठवण येते. भावार्थ तोच… आज जग बदलत आहे. साधने बदलत आहेत, माध्यमे बदलत आहेत; मात्र माणसाची विचार करण्याची पद्धती तितकीशी बदलली नाही. आजही विवेकाचा विचार, विज्ञान निष्ठतेचा विचार, बुद्धीप्रमाण्यवाद या बुद्धीच्या कसोटीवर, वैचारिक कठोर परीक्षणावर विचार करणारी तरुणाई प्रगल्भ होताना दिसत नाही. त्यासाठी खऱ्या अर्थाने ग्रंथालयाचा प्रवास महत्त्वाचा आहे आणि जबाबदारीही.
दोनशे वर्षांची परंपरा असणारे रत्नागिरी नगर वाचनालय अत्यंत अद्ययावत स्वरूपात असेल, यात फिजिकली पुस्तकांची संख्या लाखापेक्षा निश्चितच अधिक वाढेलही; मात्र पुढील काळातील नवी पिढी फिजिकली किती वाचेल हा प्रश्न आहे. त्या सोबतच येथील डिजिटल लायब्ररी अधिक समृद्ध होणे गरजेचे आहे. सोबत मराठीतील सर्व पुस्तकांचे डिजिटल संदर्भ एका क्लिकवर कसे उपलब्ध होतील आणि त्याचे संदर्भ तातडीने मिळतील अशी यंत्रणा विकसित झाल्यास ही लायब्ररी प्रत्येक घराघराचा ॲक्सेस राहिल आणि घराघरात पोहोचेल.
पॅाडकास्ट वाचन हा ग्रंथालय क्षेत्रातील वाढता प्रवाह आहे. पुस्तक वाचण्यापेक्षा ऐकणे याला अधिक प्राधान्य आहे. एका बाजूला वाचक कमी आणि लेखक अधिक असा विचित्र खेळ आज ग्रंथ प्रकाशन क्षेत्रात सुरू आहे. मला काहीतरी लिहून लेखक व्हायचे आहे, हे आज सहज शक्य आहे. खर्च करून पुस्तक प्रकाशन करायचे आणि नंतर रद्दी विकायची अशा वातावरणात चोखंदळ प्रकाशक आणि कसदार, दर्जेदार लेखक, साहित्यिक यांची पुस्तके वाचकापर्यंत नेणे हे ग्रंथालयासमोरील मोठे आव्हान आहे. त्यासाठी ग्रंथपाल आणि कर्मचारी त्यातील रुची आणि उत्कट अभिरुची असणारा लागतो. त्यामुळे अद्ययावत होणारे ग्रंथालय निश्चितच त्यांच्या अद्यावत इमारती बरोबरच अंतरंगातून अद्ययावत असेल आणि दोन शतकांचा इतिहास अधिक प्रगल्भ करेल अशी अपेक्षा आहे.



