रामगिरी महाराजांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
गुन्हेगाराविरुद्ध कार्यवाही होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही : नौसीन काझी

रत्नागिरी : रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी इस्लाम धर्माचे प्रमुख मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने देशभर मुस्लिम समाजामध्ये संताप व चिड निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (२२ ऑगस्ट) रत्नागिरीतही मुस्लिम समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन रामगिरी महाराजांविरोधत कडक कारवाई करावी, अशी मागणीचे लेखी निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. तसेच शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, राज्यात अनेक भागात त्यांनी काम केले; पण रत्नागिरीचा सलोखा हा पूर्ण राज्याला आदर्श ठरू शकेल असा आहे आणि हाच आपल्याला कायम ठेवायचा आहे. जाती- जातीचा, धर्मा-धर्मातला जो सलोखा आहे तो पूर्ण राज्याला आदर्श ठरवला जाईल, अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारचे वातावरण आपल्याकडे आहे आणि हेच आपल्याला कायम ठेवायचे आहे. आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये, एकमेकांच्या उत्साहामध्ये, सणांमध्ये, कार्यामध्ये, धार्मिक विधीमध्ये एकमेकांचे सहभागी झाले पाहिजे. हेच आपल्याला पुढे नेणार आहे. भारत देश जर आर्थिक महासत्ता व्हायचा असेल, तर सर्वांनी आपल्याला सलोख्याने कायम ठेवावे लागेल आणि आपल्याला एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावे लागेल.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी सर्वांना शांततेची आवाहन करतानाच आपले निवेदन मी घेतलेले आहे आणि आपल्या वरिष्ठ मंडळींशी चर्चा त्यांची झाली आहे. त्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी रत्नागिरी येथील मुस्लिम समाजाची प्रमुख मंडळी बशीर मुर्तुझा, मुक्ती तौफिक, रफिक विजापुरी, अलीमिया काझी, अल्ताफ संगमेश्वरी, सोहेल मुकादम, नौसीन काझी, इलियास खोपेकर, अशपाक झारी, जकी खान, फरहान मुल्ला, सोहेल साखरकर, उबेद होडेकर, सिद्धीक हकीम, साहिल पठाण, मेहताब साखरकर, अश्फाक मुजावर, फय्याज मुजावर यांच्यासह अनेकांनी पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. तसेच शहर पोलीस ठाण्यांमध्ये रितसर गुन्हा दाखल केला.

याप्रसंगी बोलताना नौसीन काझी यांनी आम्ही जोपर्यंत गुन्हेगाराविरुद्ध कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत हा लढा देणार, एकही इंच मागे हटणार नाही आणि त्या रामगिरी महाराजांविरोधात कडक कारवाई करावी असे सांगितले. याप्रसंगी रत्नागिरी शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



