लाडकी बहीण योजनेच्या जीवावर गुहागरची निवडणूक जिंकून दाखवा
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांचे भाजपला थेट आव्हान

गुहागर : महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढून प्रत्येक महिलेच्या खात्यावरती पंधराशे रुपये महिना जमा केल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे;
मात्र तुम्ही मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या जीवावर गुहागरची निवडणूक जिंकून दाखवा, असा थेट इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी भारतीय जनता पक्षला दिला आहे.
भाजपचे गुहागर तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी पत्रकार परिषदेमध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी व त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी गुहागर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने गुहागर तालुक्यातील पाटन्हाळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात २१ ऑगस्टला पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना विनायक मुळे म्हणाले, विनय नातूंवर केलेली टीका म्हणजे ब्राह्मण समाजावर टीका असे होत नाही. भास्करराव जाधव हे विनय नातूंवर त्यांच्या आवाजाची टिंगल करतात; मात्र विनय नातू यांच्यावर केलेली टीका ही ब्राह्मण समाजावर केलेली टीका आहे, असा संभ्रम भाजपकडून निर्माण करण्यात आला असून दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्यासारखे आहे. जाधवांनी आतापर्यंत कुठल्याही समाजावरती टीका केली नाही उलट त्यांनी प्रत्येक समाजाला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. मी गुहागर तालुका ब्राह्मण समाजाचा उपाध्यक्ष असून, भाजप तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे यांना सूचित करतो की तुम्ही दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये.
तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले, यापुढे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर विनाकारण खोटे आरोप करून टीकास्त्र सोडले, तर त्यांना यापुढे शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल. शिवसेना ही रस्त्यावर येणारी संघटना आहे. यापुढे अशाप्रकारचे आरोप भाजपकडून केले गेले तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. त्यानंतर होणाऱ्या परिणामाला आम्ही जबाबदार असणार नाही.
या वेळी गुहागर तालुका शिवसेना महिला संघटनेच्या वतीने बदलापूर येथील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. गुहागर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तालुका संघटक सौ. नेत्रा ठाकूर यांनी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची तसेच बदलापूर येथील घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचीमागणी यावेळी केली.



