मुख्य बातमीशैक्षणिक

संगमेश्वर नवनिर्माण महाविद्यालयातर्फे तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन

मोठ्या गटात मीनाताई ठाकरे हायस्कूल, तर छोट्या गटात दादासाहेब सरफरे हायस्कूल प्रथम : २१ संघांचा सहभाग

संगमेश्वर : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण पब्लिक स्कूल आणि भाई हेगशेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत मोठ्या गटात साडवली येथील मीनाताई ठाकरे हायस्कूल, तर छोट्या गटात बुरंबी येथील दादासाहेब सरफरे हायस्कूल यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

आंतरशालेय तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये आणि संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण, डॉ. प्रज्ञा कदम, ऍड. गिरीश गानू, गायिका निहाली गद्रे तसेच नवनिर्माण पब्लिक स्कूलचे प्राचार्य किरण गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संचालिका सौ. हेगशेट्ये म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धा आवश्यक आहे. नवनिर्माण शिक्षण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असते, त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. दरवर्षी होणारी ही स्पर्धा अधिकच स्पर्धात्मक होत असून, विद्यार्थी विविध गुणांमध्ये नैपुण्य मिळवत आहेत.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्रीमती सुतार यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा संदर्भात तसेच सायबर गुन्ह्यांबाबत घ्यायची दक्षता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस सचिन कामेरकर, किशोर जोयशी, आंब्रे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत छोट्या गटात दादासाहेब सरफरे हायस्कूलने प्रथम क्रमांक, माखजन हायस्कूलने द्वितीय क्रमांक, न्यू इंग्लिश स्कूल देवरुखने तृतीय क्रमांक पटकावला. मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवलीला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. मोठ्या गटात मीनाताई ठाकरे हायस्कूलने प्रथम क्रमांक, न्यू इंग्लिश स्कूल देवरुखने द्वितीय क्रमांक, निवे आश्रमशाळा, निवे आणि माखजन हायस्कूल यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी आणि न्यू इंग्लिश स्कूल कसबा यांनी पटकावला. या स्पर्धेत २१ शाळांनी सहभाग नोंदवला.

प्रारंभी नवनिर्माण पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत सादर केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांनी केले. प्रा. संतोष खरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button