जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी ‘सिंधुरत्न’ मधून बचतगटांसाठी ४ आधुनिक बस

रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेला ४ आधुनिक बस दाखल झाल्या आहेत. हा एक पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात आला असून, १५ ऑगस्टला पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या अलिशान टुरिस्ट बसचे उद्घाटन होणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री आणि योजनेचे प्रमुख दीपक केसरकर यांनी या गाड्यांची नुकतीच पाहणी केली. बचत गटांच्या प्रभागसंघांच्या माध्यमातून या बस चालविण्याचा प्रयत्न आहे. या पथदर्शी प्रकल्पामुळे महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. कोकणात पर्यटन रुजविण्यासासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. त्यापैकी हा एक पथदर्शी प्रकल्प रत्नागिरीत होणार आहे.
सिंधुरत्न समृद्ध योजनेतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास विभागाला या अलिशान बस दिल्या जाणार आहे. यात रत्नागिरी तालुक्याला २, संगमेश्वर आणि दापोली तालुक्याला प्रत्येकी १ बस दिली जाणार आहे. एका बसची किंमत साधारण २८ लाखांच्या दरम्यान आहे.



