मुख्य बातमी

ओणी-अणूस्कुरा मार्गावरील खड्डयात स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण करण्याचा प्रवाशांचा इशारा

राजापूर : ओणी – अणूस्कुरा मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी, रस्त्यावर लोंबणाऱ्या चिवारी, मार्गावर ठिकठिकाणी पडलेले भले मोठे खड्डे यांमुळे या मार्गाची पुरतीच दुरावस्था झाली आहे. शासन, प्रशासनासह संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे; मात्र याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे जनता संतप्त झाली असून ओणी, अणूस्कुरा मार्गावरील खड्डे भरण्यासह वाढलेली झाडी तात्काळ न हटविल्यास स्वातंत्र्यदिनी पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करू, असा इशारा देण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा नजीकचा रस्ता आहे. यामुळे या रस्तावर कायम मोठी वाहतूक सुरू असते. तर पुणे- मुंबईवरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवाकडे जाणारे प्रवासीही या मार्गाचा वापर करतात. यामुळे हा रस्ता वर्दळीचा झाला आहे. सध्या या रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढली असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. काही ठिकाणी चिवारीच्या फांद्याही रस्त्यावर लोंबकळत असल्याने याचा वाहन चालकाला याचा अंदाजच लागत नाही. परिणामी अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे. रस्त्यावर आलेल्या अन्य झाडांच्या फांद्यामुळे काही वाहनांचे आरसे तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी वाढलेल्या झाडीमुळे दिशाफलकही झाकून गेले आहेत. समोरा समोरून आलेल्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे धोके देखील वाढले आहेत.

ओणी, अणूस्कुरा मार्गावरील झाडीचा त्रास सहन करावा लागत असतानाच आता या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे देखील त्रासदायक ठरत आहेत.

ओणी, दैतवाडी, सौंदळ, खडीकोळवण, येळवण, रायपाटण, पाचल बाजारपेठ या दरम्यान तर खड्ड्याचेच साम्राज्य पसरले आहे. त्याचा मोठा फटका वाहनचालकांना बसत आहे. एकीकडे ही परिस्थिती असतानाच दुसरीकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मागील काही महिन्यांत ओणी- अणूस्कुरा मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक वाढली आहे. मुंबई- गोवा महामार्गचे रखडलेल्या चौपदरीकरणामुळे मुंबई, पुण्याकडच्या चाकरमान्यांनी ओणी- अणूस्कुरा मार्गाला पसंदी दिल्याने या मार्गावर वाहतूकीत वाढ झाली आहे. मागील वर्षी गणपती उत्सवाच्या दरम्यान या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होती. यावेळी देखील ती वाढेल हे निश्चित असताना संबंधित विभागाकडून या मार्गाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नसणे याबद्दल जोरदार संताप व्यक्त होत असून संपूर्ण मार्गावरील वाढलेली झाडी व पडलेले खड्डे तात्काळ न भरल्यास १५ ऑगस्टला खड्ड्यात वृक्षारोपण करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button