जिल्हा बँक अध्यक्षांच्या वर्तणुकीला माफी नाहीच : दीपक राऊत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २६ जुलै २०२४ रोजी ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेला मी आमच्या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. माझ्या संस्थेचा ठराव मी त्या ठिकाणी सादर केलेला आहे. बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांना अहवाल दिला जातो आणि त्या अहवालातील विविध विषयांवर चर्चा करणे, वेगवेगळ्या विषयांवर माहिती करून घेणे, किंवा संस्थेच्या सभासदांना काय सोयी आवश्यक आहेत याची मागणी करणे, यासाठी ही सभा महत्त्वाची असते. या सभेत मी काही प्रश्न उपस्थित केले. अध्यक्षांना ते प्रश्न थोडेसे त्रासदायक वाटायला लागले. त्यामुळे त्यामुळे बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांनी या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मला अपशब्द वापरले आणि भर सर्वसाधारण सभेत माझा अपमान केला आहे. असे अशोभनीय शब्द सभेत तर सोडाच पण रस्त्यावर खाजगीत बोलतानाही कोणी वापरत नाहीत. हे अत्यंत निंदनीय असून मी या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे. कारण एका उच्चविद्या विभूषित, उच्चभ्रू नेत्याने असे अपशब्द अवमानना भर सभागृहात करणे, सभागृहात जे शब्द वापरणे शोभादायक नाही ते शब्द वापरले आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सभागृहात अपशब्द ही चूकच
अहवालावर प्रश्न उपस्थित केल्यावर या प्रकारे व्यक्त होण्याची बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे. गेल्या वर्षी बँकेच्या वार्षिक अहवालावर मी प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते की सभासदांचा तुम्ही वेळ घेऊ नका. तुम्ही काही सांगायचे नाही, बोलायचे नाही. आणि हे त्यांनी अहवालात छापले. असे छापता येत नाही. हा कायद्याने गुन्हा आहे. इतिवृत्तात याची नोंद घ्यावी. अहवालातील पान क्रमांक ६३ वर विनाकारण सभासदांचा वेळ घेऊ नये, असे अध्यक्षांनी सांगितलें आहे असे स्पष्टपणे त्यात म्हटले आहे. हा मोठा गुन्हा आहे. आम्ही त्याकडेही दुर्लक्ष करतो. पण त्यानंतरही आकांड तांडव करीत त्यांनी जे अपशब्द वापरले, शिविगाळी केली, हे १०० टक्के चूक आहे,, त्या प्रकाराला कधीही माफी नाही, असे श्री. राऊत म्हणाले.
वर्षभर मुखपट्टी बांधून आंदोलन करणार
म्हणून मी या सभेच्या दिवसापासूनच संकल्प केला आहे की येत्या वर्षभरात ज्या ज्या वेळी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून, अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाताना त्यावेळी माझ्या तोंडाला काळी मुख पट्टी बांधणार आणि त्या बँकेत एकही शब्द न बोलता काम पूर्ण करून येणार आहे. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत तसाच मुख पट्टी लावून बसणार, एकही शब्द बोलणार नाही. एकही प्रश्न विचारणार नाही. काल ही मी सभेत सांगितले की मी यापुढे तुमच्या सभेत एकही शब्द बोलणार नाही. त्यानंतर ती काळी मुख पट्टी मी बँकेच्या दारात नेऊन नष्ट करणार आहे. अशा प्रकारे आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. ही त्यांची मुजोरी आम्ही कधीच खपवून घेणार नाही.
बाहेरचे तुपाशी आणि जिल्ह्यातील शेतकरी उपाशी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. या शेतकऱ्यांच्या बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले पाहिजे. याचा फायदा शेतकऱ्यांना आका पाहिजे. बँक अ वर्गात आहे. बँकेकडे भरपूर ठेवी आहेत.बँकेला नफा भरपूर होत आहे. पण यामध्ये शेतकऱ्यांना फायदा काय होतोय? हा माझा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ५६५ कोटींची कर्जे यांनी जिल्ह्याबाहेरील साखर कारखाने, अन्य कारखान्यांना वाटली. पण जर ही कर्जे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली, आंबा बागायतदार असेल, काजू बागायतदार असेल, मच्छीमार असेल, भात पिकवणारा असेल, नागली पीक घेणारा असेल, या शेतकऱ्यांना जर कर्जे दिली तर या जिल्ह्यातील शेतकरी या मातीतून माणिक मोती पिकविल. ही माझी भूमिका आहे. त्यात चुकीचे काय आहे? असा सवाल दीपक राऊत यांनी केला असून बाहेरचे तुपाशी आणि जिल्ह्यातील शेतकरी उपाशी असा हा प्रकार असल्याची टीका केली आहे.
सहकारी संस्थांच्या सचिवांना योजना लोकांपर्यंत पोहोचवायला सांगा
दुसरा माझा प्रश्न आहे की ज्या सहकारी संस्थांच्या सचिवांना आपण मानधन देतो…खुप चांगले काम आहे… पण त्यांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ज्या गावातला तो सचिव आहे त्या गावातील लोकांपर्यंत त्यांना पोहोचायला सांगा, जायला सांगा. या अहवालात भरपूर योजनांचा उल्लेख आहे. त्या योजना त्यांना समजावून सांगा, त्यात त्यांना बसवा, शासनाच्या अनेक योजना आहेत. राज्याच्या, केंद्राच्या योजना असतील तर त्या चांगल्या प्रकारे राबवता येतील.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकांसमोर कर्जासाठी रांगा का लागतात?
मी पावसचा शेतकरी आहे. तेथे माझी शेती आहे. तेथे बाजारपेठेत बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर १०० ते २०० शेतकऱ्यांची कर्जासाठी रांग लागलेली असते. आणि आमच्याकडे अनेक शाखा असून कर्जवाटप होत नाही. जी आमची शेतकऱ्यांची बँक आहे, ज्या बँकेने शेतकऱ्यांना कर्जवाटप करायचे आहे, त्यांच्याकडून शेतकऱ्यांना पैसे पोहोचत नाहीत. हे पैसे पोहोचतात कुठे तर घाटावर, पश्चिम महाराष्ट्रात पोहोचतात. तेथील साखर कारखान्यांना पोहोचतात. मग आमच्या सहकारी सोसायट्या यांच्या ठेवी आहेत, पतपेढ्या, पतसंस्थांच्या ठेवी आहेत. आमच्या ठेवी कुठल्या तर राखीव निधी, प्रोविजन फंड आहे. यातील ठेवी, पैसे आम्ही कधीही काढू शकत नाही. आम्ही काढत नाही. त्यावर बँक आम्हाला ५ नाहीतर ६ टक्के व्याज देते आणि आम्ही सी. सी. मागितला की त्यावर १२ टक्के व्याज लावले जाते. आम्ही तो फरकही तुम्हाला देतोय.
लाभांश वाढवून मागितला तेव्हा तुम्हाला अपमान वाटला
पण आम्ही जेव्हा तुम्ही जो १२ टक्के लाभांश देता तो वाढवून द्या, अशी आम्ही मागणी केली त्यावेळी तुम्ही अंगावर आलात, अद्वा तद्वा बोललात. त्यावेळीही आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या वर्षी आम्ही लाभांश वाढवून मागितला तेव्हा तुम्हाला अपमान वाटला. अपमान वाटायचे कारण काय? ही बँक, ही संस्था आमची आहे. आम्ही बँकेचे मालक आहोत. आम्ही तुमच्याकडे ठेवी ठेवतो आहोत. संपूर्ण जिल्ह्यातील ज्या आम्हा सहकारी सोसायट्याच्या ठेवी आहेत त्या आम्ही या बँकेत ठेवतो.त्यावर तुम्ही व्यवसाय करता. *तुम्ही पैसे कुठून आकाशातून आणलेले नाहीत*, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
काँग्रेसने कर्ज माफिचे पैसे दिल्यावर श्रीमंत झाल्याचे तुम्हाला वाटू लागले. पण तुम्ही श्रीमंत नाही, आम्ही श्रीमंत आहोत. हा सभासद श्रीमंत आहे
काँग्रेस सरकारने २००८ साली जी कर्जमाफी केली, त्या कर्जमाफीचे १५९ कोटी बँकेला मिळाले. काँग्रेस सरकारने तुम्हाला दिले. हे पैसे तुम्हाला मिळाले त्यावेळी तुमची स्थिती सुधारली. त्याआधी तुम्ही सभसदाना लाभांश देत नव्हता. तुम्ही तोट्यात होतात. ७ कोटी, ६ कोटी, १२ कोटी तुम्ही लॉस मध्ये होता. काँग्रेसने कर्ज माफिचे पैसे दिल्यावर श्रीमंत झाल्याचे तुम्हाला वाटू लागले. पण तुम्ही श्रीमंत नाही, आम्ही श्रीमंत आहोत. हा सभासद श्रीमंत आहे. ज्याने तुमच्याकडे ठेवी ठेवल्या तो श्रीमंत आहे. त्याची तुम्ही जाण ठेवली पाहिजे. ही जाणीव तुम्ही विसरलात आणि त्यांनाच मुजोरी दाखवता आहात.
आता ३० टक्के डीविडेंड (लाभांश) दिल्याचे सांगताय. पण हे आमच्यावर उपकार नाही केले
आता ३० टक्के डीविडेंड (लाभांश) दिल्याचे सांगताय. पण हे आमच्यावर उपकार नाही केले. तो आमचा सभासदांचा हक्क आहे. गेल्या अनेक वर्षात आम्हाला लाभांश दिलाच नाहीत आणि आज दिलात. बँकेला जो नफा झाला तो आमचा सभासदांचा आहे.



