नागरिकांची गैरसोय कमी होण्यासाठी त्वरित उपाय योजना व्हाव्यात : सतेज नलावडे

रत्नागिरी : शासनाकडून विविध लोक कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आल्या असून, त्याची कागदपत्रे पूर्ण करणे व शाळेचे विविध दाखल्यांसाठी सेतू व तहसील कार्यालय मधे गर्दी होत आहे. या गर्दीवर उपाययोजना कराव्यात यासाठी भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सचिव लिलाधर भडकमकर, भाजपा रत्नागिरी दक्षिणचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, दीपक आपटे आदींनी उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांची भेट घेतली.
यावेळी प्रशासनाला विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या यामध्ये सेतूमधील विविध कोरे फॉर्म ग्रामपंचायतीत उपलब्ध करण्यात यावे, परिपूर्ण फॉर्म ग्रामपंचायतीमध्ये भरून घेऊन सेतूमधे जमा करून संबंधित प्राप्त दाखले परत ग्रामपंचायतीमध्ये द्यावेत, जिल्ह्यातील ७६५ पैकी ४६६ ई-सेवा केंद्र बंद असून, बंद असलेली किंवा कार्यरत नसलेली केंद्र त्वरित इतराना वितरित करण्यात यावीत, तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्याना निदान बसण्यासाठी खुर्च्या व स्वच्छ पाण्याची सोय करण्यात यावी, अशा मागण्या चर्चेदरम्यान करण्यात आल्या.
ही वस्तुस्थिती मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कानावर घालण्यात येणार असून या अडचणींवर उपाययोजना करण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी यावेळी दिले.



