आर्टिकल

फसलेल्या रस्त्याची कहाणी

आमचे रत्नागिरी शहर गेल्या काही महिन्यांत अक्षरशः कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. म्हणजे जिल्हा परिषदेची इमारत म्हणू नका, जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय इमारत म्हणू नका, त्याशिवाय इतर आणखी काही कामे सुरू आहेत तीही सगळी कोटींच्या घरातली आहेत, बरं का.. पण नागरिकांच्या मूलभूत सोयीकडे म्हणजे मग ती पाणी असेल किंवा रस्ता, नागरिकांना अगदी गृहीत धरून सगळा कारभार हाकला जात आहे. नागरिकांना होणार त्रास, त्यांची गैरसोय, त्यांचे जे काही म्हणणे असेल त्याकडे “शहराचा शाश्वत विकास” या गोंडस नावाखाली सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथील श्रीमान भागोजीशेठ कीर कमानीपासून ते दांडा फिशरीजपर्यंत रस्ता कॉँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. हे करताना कॉँक्रिटीकरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून डांबरी रस्त्यावर आणखी पातळ डांबरीकरणाचा थर लावून त्यावर प्लॅस्टिक पसरवून त्यावर कॉँक्रिटचा जाड थर लावण्यात आला. अनेक सुजाण नागरिकांनी या अशा पद्धतीच्या कॉँक्रिटीकरणाच्या कामावर आश्चर्य व्यक्त करून ही केवळ पैशांची उधळपट्टी असल्याचे मत उघडपणे व्यक्त केले. त्यानंतर नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कधी एका बाजूचा रस्ता बंद करून तर कधी दुसऱ्या मार्गे वाहतूक वळवून शब्दशः नाकी दम आणला. माजगावमार्गे प्रवाशांना घेऊन निघालेली एसटी बस चर्मालयाच्या चौकातून डावीकडे वळवत ती साळवी स्टॉप इथून छत्रपती शिवाजीनगर इथपर्यंत आणायची. त्यानंतर ती बस शिवाजीनगर नाचणे यांना जोडणाऱ्या आरोग्य मंदिर येथील मधल्या रस्त्यामार्गे नाचणेमार्गे मारुती मंदिर इथे आणायची आणि तिथून मग ती शहरी बसस्थानकाकडे मार्गस्थ करायची हे तर एप्रिल-मे महिन्यात नित्याचेच. म्हणजे एका बाजूने सुरू झालेली वाहतूक मधल्या रस्त्यावरून तिसऱ्या मार्गे वाळवायची हा केवढा मोठा द्राविडी प्राणायाम कॉँक्रिटीकरणाच्या काळात महिनाभर नागरिकांनी सहन केला. हेलपाटे घालण्याचा तर हा कहरच होता. बरं हे केवळ बसचेच नव्हे तर सर्वच छोट्या-मोठ्या वाहनांनी थोड्याफार फरकाने ही कसरत केली आहे. त्यात अधे-मधे उतरणाऱ्या प्रवाशांचा तर कोणी विचारच केला नाही. त्यांना किती वळसा मारून जावा लागेल, मध्येच उतरून पुन्हा रिक्षाने जाण्याचा आर्थिक भुर्दंड तर वेगळाच. म्हणजे कॉँक्रिटीकरण करण्याच्या काळात नागरिकांच्या सहनशीलतेचा अंतच बघितला गेला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बरं एवढे सगळे करून रस्ते अर्धवटच केलेले, त्याला गाडी खाली उतरायला आणि वर चढवायला लेव्हल नसल्यामुळे गाड्या आपटून होणारे नुकसान कशात धरायचे हा मोठा प्रश्नच. हे सगळं एवढ्यावरच न थांबता कितीतरी किरकोळ अपघात, दुखापती याची तर गणती न केलेलीच बरी कारण चर्चेचा आणि लिखाणाचा तो एक आणखी स्वतंत्र विषय होऊ शकतो.
आता सद्यस्थितीत मारुती मंदिर ते चर्मालय चौक, मारुती मंदिर ते साळवी स्टॉप आणि मारुती मंदिर ते नाचणे स्टॉप (साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड) इथपर्यंत कॉँक्रिटीकरण मे महिन्यापर्यंत झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार १५ मे नंतर डांबरीकरणाची कामे केली जात नाहीत. असे असतानाही मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मारुती मंदिर ते जयस्तंभ या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले तेही रस्ते सुस्थितीत असताना. यावेळी पाऊस लवकर पडणार अशी एकंदरीत चिन्हे असतानाही कॉँक्रिटीकरणासाठी डांबरीकरणाचा घाट घातला गेला. हे डांबरीकरण आतल्या बाजूला झाकोळले जाणार म्हणून इतक्या निकृष्ट दर्जाचे केले गेले की अवघ्या एक ते दीड महिन्यात डांबरीकरण केलेल्या बारीक खडीने पहिल्या झालेल्या दणकेबाज पावसातच आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवायला सुरुवात केली; मात्र त्यांचे हे अस्तित्व वाहनचालकांना जीवघेणे ठरत आहे. गेले काही दिवस रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात तुफानी पाऊस पडत आहे. या पावसात ही बारीक खडी पावसाच्या पाण्याबरोबर मिळेल तिकडे वाहत जात आहे. खडी वाहून गेल्यामुळे रस्त्याची लेव्हल बिघडली आहे. त्यातच मोठ-मोठे खड्डे तर वाहनचालकांची एखाद्या भक्ष्याप्रमाणे वाट बघत असल्यासारखे भासत आहेत. मारुती मंदिरपासून सुरू झालेली ही मालिका संपूर्ण शहरभर पसरली आहे. त्यामुळे वाहने चालवायची तरी कशी, वाहनांचा मेंटेनन्स कसा ठेवावा, नक्की काय करावे हा प्रश्न नागरिकांसमोर असतानाच आता गेले १५ दिवस हे डांबर उकरून काढण्याचे काम हाती घेतले आहे. मालकाने (तो नेमका कोण नगरपालिका की रस्त्याचे काम करणारी कंपनी हे अद्याप समजले नाही) आदेश दिल्यानुसार काही मजूर रोज भर पावसातही ही खडी जेसीबीद्वारे किंवा फावड्याने उकरून काढण्याचे काम इमानेइतबारे करत आहेत. खडी उकरायची आणि ती रस्त्याच्या बाजूला टाकून ठेवायची हा त्यांचा नित्यक्रम. पण त्यातही ती खडी वाहून परत रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांनी बोंबाबोंब. बरं त्यातही हा जेसीबी अर्ध्या रस्त्यात उभा राहून काम करणार म्हणजे वाहतूक कोंडी ओघाने आलीच. तरीही बिचारे रत्नागिरीकर सगळे निमूटपणे सहन करत इथपर्यंत (म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत) आले, तर आज म्हणजे २२ जुलै रोजी सकाळी अगदी शाळा, कार्यालये भरण्याची वेळ साधत जेसीबीबरोबरच डंपरही रस्त्यात आणून उभा केलेला का तर काढलेली खडी भरण्यासाठी.. आता जेसीबी आणि डंपर ऐनवेळी, ऐन ठिकाणी उभे केले तर पुन्हा ओघाने वाहतूक कोंडी पण आलीच की… आणि या गोंधळात ॲम्ब्युलन्स अडकलेली असेल तर…? सायरन वाजवत कसाबसा मार्ग काढत ती तर गेली पण शाळकरी मुलांचे काय? कितीतरी वेळ हा गोंधळ मारुती मंदिर परिसरात बघायला मिळाला.
बरं नागरिकांची इतकी वाईट अवस्था असताना त्यांनाच गृहीत धरून नुसती नुसती विकासकामांची कोट्यवधींची यादी वाचण्यात काय हाशील, हे न उलगडलेले कोडेच. रस्त्याची ही कामे पावसातही करायचीच आहेत तर निदान इथे तरी लोकांचा विचार करून ती रात्रीच्या वेळी करावीत जेणेकरून किमान वाहतूक कोंडी हा प्रश्नच उरणार नाही. पण नाही नागरिकांना तर आधीच गृहीत धरलेले असल्याने बाकी सगळे नगण्य आहे आणि बाकी काही झाले तरी भर पावसातही रस्त्याची कामे करणारच आहे.
तर अशी आमच्या रत्नागिरीतल्या फसलेल्या रस्त्यांची कहाणी सुफळ संपूर्ण…

–  कोमल कुळकर्णी-कळंबटे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button