रत्नागिरीत “तिएत्रि” संगीत सभा उत्साहात

रत्नागिरी : येथील मुग्धनाद संगीत अकॅडमीतर्फे दरवर्षीप्रमाणे कै.गजानन भट स्मृती प्रित्यर्थ “तिएत्रि” संगीत सभा उत्साहात साजरी झाली. सलग आठव्या वर्षी रत्नागिरी येथील शास्त्रीय संगीत गायिका सौ. मुग्धा भट-सामंत व त्यांच्या शिष्य परिवाराने संपूर्ण रागदारी संगीत सादर करून रसिकांची मने जिंकली. यामध्ये वय वर्ष ५ ते ६३ या वयोगटातील विद्यार्थ्यांनी गायन सादर केले.
सकाळी ९ वाजता सौ. मुग्धा भट-सामंत व त्यांचे पती योगेश सामंत यांनी दीपप्रज्वलन केले व कै. गजानन भट यांच्या फोटोला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात केली. सुरवातीला स्वरा लिंगायत, जुई जोशी, इंद्रनील आठल्ये, अनन्या घारपुरे, शारदा पटवर्धन, राधा खानोलकर व पूर्वा शौच्ये यांनी वेगवेगळ्या रागात छोटा ख्याल व तराणा सादर केले. त्यानंतर योगेश पाटील, अनुष्का देवरुखकर, सार्था गवाणकर, समीक्षा मुकादम, समृध्दी रानडे, समृध्दी रसाळ, सानिका लिंगायत, कल्पजा जोगळेकर, सानिका गोखले, केतकी पुरोहित, सौ. प्राजक्ता जोगळेकर व डॉ. सौ. मेधा गोंधळेकर यांनी वेगवेगळ्या रागात बडा ख्याल सादर केला. या सर्वांना केदार लिंगायत, प्रथमेश शहाणे, पुष्कर सरपोतदार यांनी तबला साथ केली व महेश दामले, चैतन्य पटवर्धन, ओजस करकरे यांनी हार्मोनियम वर समर्पक साथ केली.
एकदम छोट्या वयोगटातील मुलांनी स्वरांचे गीत, थाट गीत व ‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’ हे चित्रपट गीत सादर केले. कार्यक्रमाची सांगता सौ. मुग्धा भट-सामंत यांनी राग नट बिहाग व भैरवी रागातील एक बंदिश गाऊन केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. जयश्री जोग यांनी केले. कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था पांडुरंग बर्वे यांनी बघितली.



