मुख्य बातमीराजकीय

रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी दावा करणार : जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव 

अजित पवार, सुनील तटकरे यांची भेट घेणार शिष्टमंडळ 

गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँगेसतर्फे उमेदवार द्यावेत, अशी आमची मागणी असून महायुतीतून हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाला सोडावेत यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी दिली.

राज्याची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आता हे जवळजवळ निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली असून, मतदारसंघांवर दावे करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँगेस अजित पवार पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघातून विद्यमान आमदार शेखर निकम यांना पुन्हा संधी मिळावी, तर राजापूर व गुहागर या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाला मिळावा अशी मागणी जोर धरत असून यासंदर्भात रत्नागिरी जिल्हातील राष्ट्रवादीतर्फे पक्ष नेतृत्व म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे करणार असल्याचे श्री. जाधव म्हणाले.

चिपळूण विधानसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. तिथे विद्यमान आमदार शेखर निकम अतिशय उत्तमप्रकारे काम करत असल्याने तेच पुन्हा उमेदवार असावेत, तर राजापूर मतदारसंघात अजित यशवंतराव हे अतिशय उत्तमप्रकारे काम करत असल्याने त्यांना राजापूरमधून उमेदवारी मिळावी. तसेच गुहागर मतदारसंघ जरी आम्हाला मिळाला, तरी तेथे सुद्धा एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असून तेथे सुद्धा राष्ट्रवादीचे काम चांगले असल्याने आम्हाला तेथून उमेदवारी मिळाली तरी चालेल. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून दोन विधानसभा मतदारसंघ मिळावेत अशीच आमची मागणी पक्ष नेतृत्वाकडे असेल, असे श्री. जाधव यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button