जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरला दोन सुवर्णपदके

रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ वी सिनियर महिला व पुरुष ज्युनिअर आणि सबज्युनिअर ७ वी कॅडेट मुले व मुली रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद क्युरोगी व पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२४-२५ नुकतीच राजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मोठ्या उत्साहात झाली. यात रत्नागिरीतील SRK तायक्वांडो क्लबची खेळाडू स्वरा साक्षी विकास साखळकर हिने या स्पर्धेत फ्री स्टाईल पुमसे प्रकारात १, तर क्युरोगीमध्ये कॅडेट गटात १ अशी २ सुवर्णपदके मिळविले.
या स्पर्धेत ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये रत्नागिरीतून ६० मुले सहभागी झाली होती. स्वराने मिळवलेल्या या यशामुळे भद्रावती (जि. चंद्रपूर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे, राजापूर येथील स्पर्धेसाठी स्वरा हिला SRK तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक श्री. शाहरुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, SRK टायकोंडो क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वरा ही दामले शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिथे कौतुक होत आहे.



