Uncategorized

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रा. सचिन सनगरे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात बोलताना प्राचार्या डॉ. आशा जगदाळे. शेजारी मान्यवर

या वेळी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कला शाखा प्रमुख डॉ. पूजा मोहिते, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. वर्षा कुबल, मराठी विभागप्रमुख प्रा. सचिन गिजबिले, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. सनगरे म्हणाले, ‘लोकसंख्या ही कोणत्याही देशाची संपत्ती असते; मात्र वाढती लोकसंख्या ही नियोजनबद्ध असेल तर ती ताकद असते आणि याचा नकारात्मक विचार केला तर ती समाजाला पोखरू शकते. त्यामुळे नुसती संख्या वाढविण्यापेक्षा सक्षम, कार्यात्मक लोकसंख्या वाढविणे गरजेचे आहे. कार्यात्मक लोकसंख्येचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दिसून येतो. शिक्षणाच्या अभावामुळे लोकसंख्या वाढत असून, शिक्षणप्रणाली सक्षम असणेही तितकीच गरजेची आहे. कारण शिक्षण आणि विकासावर खर्च होण्यापेक्षा लोकसंख्या नियंत्रण, सुविधा, पर्याय यावरच आपली ताकद वाया असून त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो.’

स्वत:कडे आर्थिक व्यवस्थेतील उत्पादक म्हणून बघण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देताना प्रा. सनगरे म्हणाले, ‘आज अनेक देशांची लोकसंख्या आपल्यापेक्षा कमी आहे परंतु ते भारताच्या पुढे आहेत कारण तंत्रज्ञानाचा वापर. तंत्रज्ञानाने आपला विकास केला की अधोगती याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी करण्याऐवजी ते आपले शोषण करत आहे. असे होऊ न देता सेवा क्षेत्र, फूड इंडस्ट्री, आयटी इंडस्ट्री यांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी काम करूया.”

प्राचार्या डॉ. जगदाळे म्हणाल्या, ‘आपली कार्यक्षमता देशाच्या आर्थिक विकासासाठी वापरली पाहिजे. तरुण पिढीने आर्थिक व्यवस्थेत योगदान देणे गरजेचे आहे. आज लोकसंख्या वाढत असली, तरी संसाधने मर्यादित आहेत त्यांचा सुयोग्य वापर करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रित करणे आवश्यक आहे. आपण या लोकसंख्येचा वापर प्रत्येक क्षेत्राचा विकास करून आर्थिक विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी केला पाहिजे. माझे काम काय आहे, मी कसा अर्थव्यवस्थेत सहभागी होऊ शकतो याचा विचार करायला हवा.’

कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील मुलांसाठी निबंध आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल असा : वरिष्ठ महाविद्यालय, निबंध स्पर्धा – आर्या प्रदीप सनगरे (प्रथम), स्नेहल प्रमोद सूर्यराव (द्वितीय), सानिका संदीप पेजे. पोस्टर स्पर्धा – स्नेहल प्रमोद सूर्यराव (प्रथम), हसन कापडे (द्वितीय), मेहेक गडकरी (तृतीय). कनिष्ठ महाविद्यालय, निबंध स्पर्धा (मराठी माध्यम) – नेहल हेमंत भुजबळराव (प्रथम), हाजरा इम्रान घारे (द्वितीय), रसिका गजानन सनगरे (तृतीय). इंग्रजी माध्यम – रिना शब्बीर सोलकर (प्रथम), सानिया तांबे (द्वितीय), झिका झहीर अलवारी. पोस्टर स्पर्धा – अन्वीषा ओंकार मठपती, (प्रथम), मारिया वसिम कुंभये (द्वितीय), रूहीना मुबारक बारगीर (तृतीय).

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. वर्षा कुबल यांनी केली. ‘एनएसएस’चे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशील साळवी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. उमेरा काद्री यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button