चिखली येथे कृषीदिनानिमित्त वृक्षदिंडी आणि वृक्षलागवड
गुहागर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुहागर पंचायत समिती, तालुका कृषी विभाग व ग्रामपंचायत चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे कृषीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर, सरपंच सौ. मानसी कदम, उपसरपंच सुभाष दळवी, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, एस.के.-४ हळदीचे प्रणेते सचिन कारेकर, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका वाडकर, कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे, गणपत पाडावे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून स्व.वसंतराव नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कृषी अधिकारी श्री. धायगुडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
गट विकास अधिकारी श्री. केळस्कर यांनी कोणत्याही शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नसल्याचे सांगितले. कृषी दिनानिमित्त वृक्षलागवडीच्या स्तुत्य उपक्रमात ग्रामपंचायत चिखली व युवा सामर्थ्य ग्रुपने पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक करून आपण पर्यावरण रक्षणाचे मोलाचे कार्य करत असल्याचे ते म्हणाले.

प्रामाणिकपणे शेती केली तर शेतीतून चांगले अर्थार्जन होवून आत्मसन्मानाने जीवन जगू शकतो. त्यामुळे तरुणांनी शेतीत काम करावे, असे आवाहन एस.के.-४ हळदीचे प्रणेते व गारवा कृषी पर्यटन केंद्राचे संचालक श्री. कारेकर यांनी यावेळी केले. तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी स्व.वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत केलेल्या कार्यातील महती विशद केली.
कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोपाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा चिखली क्र. १ व २ च्या विद्यार्थ्यांनी यावेळी वृक्षदिंडी काढली. तसेच गुहागर-चिपळूण व चिखली- तळवली रस्त्याच्या दुतर्फा वड व जांभूळ लागवडीचा शुभारंभही यावेळी मान्यवरांसह युवा सामर्थ्य ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला. ‘वृक्षतोडीचे दुष्परिणाम’ याविषयावर जिल्हा परिषद शाळा क्र. २ च्या विद्यार्थ्यांनी मुकनाट्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी केले. तर आभार कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे यांनी मानले.
यावेळी माजी सरपंच मंगेश कदम, कृषी अधिकारी सर्जेराव कांबळे, कृषी विस्तार अधिकारी प्रतीक जाधव, ग्रामसेवक संजय गोरे, ग्रामपंचायत सदस्य
विजय गमरे, निर्भय दळवी, सौ. निधी गांगण, साक्षी साळवी, सौ.मधुरा गोयथळे, पराग जोगळे, सौ. मधुरा सोलकर, मुख्याध्यापक मकरंद विचारे, मुख्याध्यापक सौ. आंबवकर, युवा सामर्थ्य ग्रुपचे दिनेश कदम, वाडीप्रमुख सचिन राऊत, सचिन गमरे, अशोक साळवी, अशोक गावणकर, कृषी सहाय्यक श्रीदेवी बाडगी, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.




