मुख्य बातमी

विलवडे स्टेशनवर आणखी एका एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी

विलवडे रेल्वे प्रवासी संघाने घेतली बेलापूर कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट

रत्नागिरी : रत्नागिरीतील विलवडे स्टेशनवर दिवा- सावंतवाडी एक्सप्रेस, कोकणकन्या आणि तुतारी एक्सप्रेस या गाड्यांव्यतिरिक्त आणखी एखाद्या एक्सप्रेसचा थांबा मिळावा, या मागणीसाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी यांनी २७ जूनला बेलापूर येथील रायगड भवनमध्ये मुख्य वाणिज्य प्रबंधक डी. एस. लिंगराजू व उप मुख्य वाणिज्य प्रबंधक राजेंद्र दिनकर घोलप यांची भेट घेतली. यासंदर्भात विलवडे रेल्वे प्रवासी संघाचे सल्लागार सुभाष लाड यांनी माहिती दिली.
विलवडे स्टेशनवर जनशताब्दी किंवा मांडवी यापैकी एखाद्या गाडीला थांबा द्यावा याबाबत विस्तृत स्वरूपात चर्चा झाली. प्रयोगादाखल एखादी गाडी सुरू करण्याची त्यांनी विनंती मान्य करून जर प्रवाशांचा योग्य तो प्रतिसाद मिळाल्यास ती गाडी कायमस्वरूपाची करण्यात येईल रेल्वे अधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले. सणांसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष सर्व गाड्यांना विलवडे येथे थांबा देण्याचेही त्यांनी मान्य केले.
विलवडे रेल्वे प्रवासी संघ, मुंबई ला या ऑगस्टमध्ये एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात संघटनेचे सरचिटणीस राज हांदे यांनी अनेकदा विलवडे स्टेशनला भेट देऊन तिथल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचवण्याचे काम केले. याच कार्याचा एक भाग म्हणून रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी सुभाष लाड, राज हांदे, सुहास खामकर, सदानंद खामकर, दीपक जानस्कर, सुनील लोणकर, रमेश गुरव, सुहास लिंगायत, हितेश कानागळ, प्रशांत पालकर, रमेश बेर्डे, विश्वनाथ आयरे, सौ. गीता हांदे उपस्थित होत्या.
या भेटीत रेल्वे अधिकाऱ्यांनी निवेदनातील प्रत्येक बाबींवर विस्तृत चर्चा केली. कोकण रेल्वेकडे पुरेसा फंड नसल्यामुळे आपण अनेक एनजीओंच्यामार्फत सोयीसुविधांची कामे करत असल्याची माहिती देऊन आपण विलवडे स्टेशनसाठी ही तसे प्रयत्न करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. फलाटावरती प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या शेडबाबत आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपणही देणगीदार मिळवून शेड उभारण्याच्या प्रयत्नास हातभार लावू, असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.
राजापूर आणि लांजा तालुक्यातील खेडेगावांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने विलवडे रेल्वे स्टेशनवरच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कार्यरत असलेल्या विलवडे प्रवासी संघाला मुंबईतून पाठबळ देण्याचे ठरवले. रेल्वे स्टेशनच्या फायदा घेणाऱ्या मुंबईतील प्रवाशांसाठी मुंबईत मेळावा घेण्याचे ठरले. या मेळाव्यात विलवडे रेल्वे प्रवासी मुंबईची समिती तयार झाली असून, अध्यक्षपदाची जबाबदारी पत्रकार संजय कदम, तर सरचिटणीस पद राज हांदे सांभाळत आहेत. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि विलवडे रेल्वे प्रवासी संघ ग्रामीण व मुंबई यांनी एकत्रित येऊन गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांच्याकडून विलवडे रेल्वे स्टेशनच्या बाबतीतल्या विविध मागणी पत्रकांवरती सह्या घेतल्या. याकामी विलवडे रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेने सहकार्य लाभले. त्यानंतर सर्व निवेदने व प्रवाशांच्या सह्यांचे कागद रत्नागिरी येथील विभागीय कार्यालय व बेलापूर येथील मुख्य कार्यालयात सुपूर्त करण्यात आली. पुढे दिलेल्या पत्रांची कार्यवाही काय होते आहे याचीही माहिती यावेळी घेण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button