
रत्नागिरी : धो-धो पाऊस पडत असतानाही कुवारबाव परिसरात आज (२८ जून) पाणी नसल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरवर्षी, विशेषतः पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येकडे शासनकर्ते आणि जबाबदार अधिकारी कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
याबाबत या परिसरातील नागरिक आतिक पाटणकर यांनी आवाज उठवला आहे. दरवर्षी, विशेषतः पावसाळ्यात ही समस्या का उद्भवते याचा विचार शासनकर्ते आणि जबाबदार अधिकारी का करत नाहीत? जनतेला गृहीत धरून चालणे कितपत योग्य आहे? कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस पडूनसुद्धा पाण्याची समस्या का निर्माण होते याकडे गांभीर्याने लक्ष कधी दिले जाणार? की विकासाच्या नावाखाली जंगले, झाडे तोडून, भ्रष्टाचाराची मलय खाण्यासाठी मोठमोठे हायवे बांधत राहणार? आपली प्राथमिकता काय असायला हवी, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
राज्याचा विचार केल्यास सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो; मात्र पावसाचे चार महिने संपले की इथे पाण्याचे दुर्भिक्ष सुरू होते. हे होऊ नये यासाठी कोकणात पावसाचे पाणी वाया जाऊ न देता पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे यासंदर्भात सर्वच नागरिकांचे प्रबोधन व्हायला हवे, तसेच भावी पिढीलाही याचे गांभीर्य कळावे यासाठी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. नदी, विहीर, तलाव, बंधारे यांत पावसाचे जास्तीत जास्त पाणी कसे साठेल याचे नियोजन सरकारी पातळीवर व्हायला हवे, असे मत श्री. यांनी यावेळी मांडले.
पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती असल्याने कुठल्याही परिस्थितीत पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. नाहीतर कोकणात दरवर्षी असाच तुफानी पाऊस पडत राहणार आणि ते पाणी तसेच वाया गेल्यावर पावसाळ्यानंतर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार, हे असेच चालू राहणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.



