पावसातूनही भाविकांना श्रींच्या दर्शनाची ओढ कायम
अंगारकी चतुर्थीनिमित दिवसभरात ६० हजारांवर भाविकांनी घेतले दर्शन

रत्नागिरी : दीड वर्षांनी आलेल्या अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपतीपुळे येथील श्रींच्या दर्शनासाठी आज (ता. २५) प्रचंड गर्दी झाली होती. सकाळपासून संततधार पावसातही भक्तगण दर्शन रागांमध्ये उभे होते. दिवसभरात सुमारे ४० हजार भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर पुढे रात्री मंदिर बंद होईपर्यंत हा आकडा ६० हजारांवर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे गर्दी कमी होईल अशी अपेक्षा होती; परंतु दर्शन रागांमधील जागा मोकळी राहिलेली नव्हती. दुपारी अर्धा तास मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी लोकांची गर्दी सुरू झाली.
अंगारकीनिमित्त मुख्य पुजार्यांनी गणपतीपुळेतील श्रींच्या मूर्तीसमोर पुष्पमालांची आरास केलेली होती. पहाटेला पुजा आटोपल्यानंतर ५.३० वाजण्याच्या सुमारास दर्शनाला सुरुवात झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगावसह मुंबई, पुण्यातील भक्तगण काल मध्यरात्रीपासून गणपतीपुळे येथे दाखल होण्यास सुरूवात झाली. सुमारे ५०० हून अधिक भक्तगण पहाटेला दर्शन रांगेत उभे होते. काहींनी देवस्थानच्या निवास व्यवस्थेचा, तर काहींनी हॉटेल-लॉजिंगचा आधार घेतलेला होता. कालपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. मंगळवारी सकाळपासून संततधार सुरूच होती.
मंदिरात श्रींचे दर्शन घेतल्यानंतर भक्त थेट दुकानांमध्ये खरेदीसाठी जात होते. दुपारी ३ वाजेपर्यंत ४० हजार लोकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुढे रात्री मंदिर बंद होईपर्यंत हा आकडा ६० हजारांवर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अंगारकी उत्सवानिमित्त संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्यावतीने सायंकाळी ४.३० वाजता वाजता स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणामार्गे ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत काढण्यात आली. या मिरवणुकीत देवस्थान समितीचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर, मुख्य पुजारी यांच्यास सर्व पंच आणि भक्तगण सहभागी झालेले होती. पाऊस असतानाही या मिरवणुकीत भक्तांचा सहभाग उल्लेखनिय होता.
दरम्यान, मुसळधार पाऊस, वेगवान वारे यामुळे समुद्र खवळलेला असल्याने पर्यटकांना किनार्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. पोलिसांसह ग्रामपंचायतीने नेमलेले जीवरक्षक दिवसभर तैनात होते. किनार्यावर कोणीही जाऊ नये यासाठी दोरी बांधण्यात आली होती. तसेच कोणीही जाण्याचा आग्रही धरलाच तर त्याला मनाई केली जात होती. त्यामुळे पर्यटकांची पावले आपसुकच हॉटेल, दुकानांकडे वळलेली होती. दिवसभरात साधारणपणे सुमारे एक कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अंगारकीसाठी परजिल्ह्यातील सुमारे २० हून अधिक व्यावसायिकांनी स्टॉल लावलेले होते, तर २५ हून अधिक स्थानिकांचे स्टॉल यात्रेच्या ठिकाणी होती. सध्या पावसामुळे पर्यटन हंगाम संपुष्टात आला आहे. त्यामुळे यंदाची अंगारकी व्यावसायिकांच्या पथ्थ्यावर पडली आहे.



