जिल्ह्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

रत्नागिरी : जन्मोजन्मी हाच पती लाभू देत, असे मागणे मागत ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा जिल्हाभरात अतिशय उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सुवासिनींनी वटपौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने डाचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. पारावर जाऊन पूजा करण्याबरोबरच अनेकींनी वडाच्या वृक्षाचे रोपण करून नवीन पायंडा पडला. आज पावसाने उघडीप दिल्याने सुवासिनींच्या उत्साहाला भरते आले होते. वड पुजणाऱ्यांमध्ये नवीन लग्न झालेल्या सुवासिनींची संख्याही लक्षणीय होती.
मध्यंतरी वडाचे झाड तोडून त्याच्या फांद्या पुजण्याचा प्रकार बळावला होता; मात्र अलीकडे समाज माध्यमांमधून होत असलेल्या जनजागृतीचा परिणाम दिसून येत होता. सुवासिनींनी घरी फांद्या पुजण्यापेक्षा बाहेर पडून वडाच्या पारावर जाऊन प्रत्यक्ष वडाचे पूजन करण्यावर भर दिला. त्यामुळे रत्नागिरी शहरासह जिल्हाभरात पुरातन वडाचे वृक्ष आज सुवसिनींच्या गर्दीने फुलून गेले होते.
दरम्यान, वडाच्या पुजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याची गडबड कालपासूनच महिला वर्गात दिसत होती. पूजा साहित्यासह वाण म्हणून दिले जाणारे साहित्यही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते.



