जिंदाल वायू गळती ते जिल्हा पालकमंत्री

– अभिजीत हेगशेट्ये
रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील सर्वाधिक मोठे पोर्ट आणि ऊर्जा प्रकल्प असणारी जिंदाल कंपनी हे या जिल्ह्याचे विशेष औद्योगिक वैशिष्ठ्य आहे. नावा-शेवाच्या पाठोपाठ विकसित होणारे अतिभव्य पोर्ट म्हणून या कंपनीकडे पाहिले जाते. कोळसा, लिक्वीड ते गॅस अशा मालाची आयात निर्यात करणारे हे पोर्ट आहे. अशा कोकणातील औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या जिंदाल कंपनीला राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी ”जिंदालने मस्तीत राहू नये” असा थेट एकेरी भाषेत इशारा द्यावा असे घडले तरी काय? असा उत्कंठतेचा प्रश्न आज कोकण किनारपट्टी आणि संपूर्ण महाराष्ट्रातच व्यक्त होत आहे. असे नक्की काय घडले असावे की अत्यंत संयमशील असणारे राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत या प्रश्नावर इतके आक्रमक का झाले असतील! नक्की जिंदालने अशा कोणत्या खेळ्या केल्या की करविल्या की ज्यामुळे हा प्रश्न इतक्या टोकाला गेला असेल!
या मागच्या वास्तवाकडे, बातमी मागच्या बातमीकडे डोकावणे त्यासाठी फार महत्त्वाचे आहे. १२ डिसेंबर २०२४ रोजी जयगड येथील जिंदाल प्रकल्पाच्या ठिकाणी अचानकपणे वायू गळती झाली. ही वायू गळती एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की नांदीवडे विद्यामंदिर येथील विद्यार्थी या वायू गळतीने प्रचंड बाधित झाले. ६१ मुलांना या वायू गळतीचा त्रास झाला. त्यातील काही अस्वस्थ झाले. त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मिळेल त्या वाहनाने आणले. कंपनीचे अधिकारी या घटनेकडे फिरकलेही नाही परिणामी स्थानिक नागरिकांत प्रचंड संतापाची लाट उसळली. हा काळ नवे मंत्रिमंडळ निर्णय, शपथविधी वगैरे राजकीय धावपळीचा होता; मात्र ना. उदय सामंत यांनी या घटनेची दखल घेत थेट नांदिवडे आणि रत्नागिरी रुग्णालयात धाव घेत वायू बाधित मुले नागरिकांना आधार दिला आणि त्यांच्यासाठी सर्व ती आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

या घटनेनंतर काही दिवसांचा कालावधी गेला. आणि जिंदाल कंपनीने काही माध्यमांना हाताशी धरत ही वायू गळतीचा आणि जिंदाल कंपनीचा काही सुतराम संबध नाही अशी हाकाटी अत्यंत धमाकेदार पद्धतीने सुरू केली. प्रतिथयश सो कॉल्ड साहित्यिक, विशेषज्ञ पत्रकार, शोध पत्रकारितेतील मान्यवर आदीती खास संशोधन समिती नेमण्यात आली. त्यातून विविध कथानके रचण्यात आली. शाळेतील वायू गळती ही शाळेतल्या चहासाठी असणाऱ्या गॅस सिलेंडरमधूनच झाली असेल असा जावई शोधही लावला. येथील सांडपाणी गटार यांतील गॅस ही असू शकेल. ही मालिका अनेक दिवस पुन:पुन्हा आमचा संबध नाही नाहक जिंदालसारख्या अत्यंत सज्जन कंपनीला यात गुंतविले जात आहे, असे सांगण्याचा आटापीटाच करत होते. आज काल सोशल मीडियाला जिंदालसारख्या महाकाय कंपनीला हाताशी धरणे फारच सोपे; मात्र यांतून दोन गोष्टी कंपनी सातत्याने सांगत होती. त्यातील पहिला भाग होता हे गावकरी, ती वायूबाधित मुले सारे खोटे बोलत आहेत. बनाव करत आहेत. कंपनीकडून पैसे उकळण्यासाठी करत आहेत. असे वातावरण तापविण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ अत्यंत संतप्त झाले होते आणि त्यावेळी कंपनी हेही ठोसपणे बिंववित होती की येथील आमदार ना. उदय सांमत कंपनीवर वायू गळतीचा करत असलेला आरोपही धादांत खोटा आहे.
आता प्रश्न हा आहे की, एक उद्योग कंपनी राज्याच्या उद्योगमंत्र्यांना थेट आव्हान देऊ शकते हे कोणत्या बळावर? या मागे नक्की काही बलाढ्य शक्ती असल्याशिवाय कंपनी हे धाडसच करू शकणार नाही. कंपनीचा देशभरातील वाढता पसारा आणि त्यांची थेट दिल्लीच्या सरकाराशी असणारी सलगी आणि सध्या काही विशिष्ठ उद्योगांना मिळणारे विशेष संरक्षण या माध्यमातून कंपनी अशा पद्धतीचे धाडस करू शकते का? हा प्रश्न सध्या अत्यंत उत्कंठावर्धक आहे.
जिंदाल कंपनीची वायू गळती झालीच नव्हती. ६१ मुले बाधित झाली त्याचा जिंदाल कंपनीच्या वायू गळतीशी काहीही संबध नाही असा कंपनीचा दावा असताना कंपनीने वायू गळतीने बाधित झालेल्या मुलांसाठी नुकसानभरपाई (प्रत्येकी ७५ हजार रुपये) या प्रमाणे प्रशासनाकडे जमा केली आहे. सुरभी हॅास्पिटल येथे चेकअप आरोग्य सुविधा दिल्या आहेत. कंपनीमुळे होणारे नुकसान भरपाईसाठी येथील मच्छिमारांना भरपाई दिली आहे. हे सारे जिंदाल कंपनीने का दिले? ते कंपनीची वायूगळती झाली म्हणूनच असे पत्रकार परिषदेत सांगत ना. सामंत यांनी सांगितले की, वायू गळती जिंदाल कंपनीचीच आहे. ती प्रत्यक्ष जहाजातून प्लँटमधून की टँकरमधून झाली ते येत्या काही दिवसांत रिपोर्टमध्ये समजेल. जिंदाल कंपनीने वायू गळती झालीच नाही असा दावा करू नये असे सांगतांना त्यांनी कंपनीला इशाराच दिला की, कंपनीने येथील नागरिकांना गृहीत धरू नये, तसेच कंपनीने मस्तीतही राहू नये. ना. सामंतांचा हा इशारा फारच तिखट होता. यापुढे जात त्यांनी सूचित केले आहे की, अशाच प्रकारे घटनेची पुनरावृत्ती झाल्यास त्याची गय केली जाणार नाही.
या साऱ्या घटनांकडे पाहिल्यास हे प्रकरण जिल्हा राज्य पातळीवरचे दिसत नाही त्याला दिल्लीश्वरांचा भक्कम पाठिंबा असल्याशिवाय थेट उद्योगमंत्र्यांनाच दखलअंदाज करण्याचे धाडस कंपनी करणार नाही. सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री नेमण्याबाबत रोज नवे प्रमाद येत आहेत. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात दोन-दोन नावे पुढे येत आहेत, मात्र अचानक दोन दिवसांत भाजपचे नाव रत्नागिरी जिल्हा पालकमंत्र्यांच्या चर्चेत आहे. ही सारी सूत्रे याच माध्यमातून तर हलत नसतील ना, अशा चर्चा मात्र जोरदार सुरू आहेत. ही वायू गळतीची धग थेट पालकमंत्रीपदापर्यंत तर पोहोचत नाही ना?



