Uncategorized

कोकण पदवीधर मतदारसंघातून कॉँग्रेसकडून रमेश कीर यांचा अर्ज दाखल

बेलापूर : विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून रोजी होणार असून, कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे रमेश कीर यांनी आज (३ जून) आपला उमेदवारी अर्ज कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल केला.
या वेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ कॉँग्रेस नेते आबा दळवी, राजेश शर्मा, पनवेल शहर जिल्हा कॉँग्रेस कामिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील उपस्थित होते. कॉँग्रेस पक्ष या चार जागांपैकी दोन ठिकाणी लढणार असल्याची माहिती नुकतीच महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली होती. बरीच कालावधीनंतर कॉँग्रेस पक्षाच्या चिन्हावर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक लढली जाणार आहे.
या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. ७ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. या अर्जांची छाननी १० जूनला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून आहे. २६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघासाठी मतदान होईल. १ जुलैला मतमोजणी होणार असून, ही संपूर्ण प्रक्रिया ५ जुलै रोजी पूर्ण होणार आहे. ७ जूनला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल.
दरम्यान, २८ मे रोजी मुंबई शिक्षक मतदारसंघात १५ हजार ९१९ एवढी मतदारसंख्येची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात ६६ हजार ५५७, मुंबई पदवीधर मतदारसंघात १ लाख १६ हजार ९२३, तर कोकण पदवीधर मतदारसंघात २ लाख १३ हजार ९१७ एवढ्या मतदारसंख्येची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button