मुख्य बातमीराजकीय

विधान परिषदेची निवडणूक २६ जूनला

शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी आयोगाकडून नवीन कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी होणाऱ्या निवडणुकीची नवीन तारीख जाहीर करण्यात आली असून, या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलैला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी ३१ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. शेवटची मुदत ७ जून ठेवण्यात आली आहे. अर्जाची छाननी १० जून, तर अर्ज माघारी घेण्यासाठी १२ जून आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जूनरोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीतच ही निवडणूक जाहीर झाल्याने शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत पुढे ढकलण्यात आली होती. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. आयोगाने या संदर्भात विचारविमर्श करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उक्त द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या चार मतदारसंघांतील निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button