आर्टिकल

मा. जिल्हाधिकारी महोदय, आम्हाला खड्ड्यातून वाचवा हो!!

जिल्हाधिकारी हे असे पद आहे की ज्यांना सर्वाधिक अधिकार आहेत. त्या जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्य, शिक्षण, सामाजिक स्वास्थ्य, रस्ते, पाणी , सुरक्षा आदी प्रत्येक प्रश्नांची जबाबादारी आणि अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी रत्नागिरी शहरावासीयांच्या अडचणी, समस्या आणि त्यातून निर्माण झालेली गैरसोय, संताप, अस्वस्थता, मरणासन्नता, त्यातून आंदोलन, आक्रंदने याकडे का दुर्लक्ष करत आहेत? हा तमाम रत्नागिरीकरांना प्रश्न पडला आहे. रत्नागिरीकरांच्या या समस्यांवर तातडीने उपाय योजना करण्याचा अधिकार आणि सत्ता जिल्हाधिकारी यांच्या हाती असताना प्रत्यक्षात मात्र जिल्हाधिकारी रत्नागिरीच्या समस्यांना सामोरे जाण्यापेक्षा या समस्या रत्नागिरीकरांनी त्यांच्यापर्यंत आणूच नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करतात आणि सर्वसामान्य माणसांच्या होणाऱ्या गैरसोई विरोधात प्रकट होण्यासाठी रत्नागिरीकरांना कायद्याच्या बडग्याची भीती दाखवली जावी असे का? हे कितपत योग्य आहे?
रत्नागिरी शहरातील जनतेची अवस्था अत्यंत विदीर्ण आणि हृदयद्रावक झाली आहे. पावसाचा कहर आहे, प्रत्येकाला आपल्या कामावर जायचे आहे, मुलांना शाळेत जायचे असते, पर्यटकांना यायचे आहे, दुकानांसमोर माणसे उभे रहाण्यासाठी जागा पाहिजे, या शहरातील रस्ते हे एखाद्या खंडर गावासारखे भग्नावस्थेत आहे. त्यावरील खड्डे इतके भीषण आणि भयावह आहेत की हे खड्डे म्हणजे रत्नागिरीकरांच्या मृत्यूचे सापळेच रचले आहेत. या खड्याच्या प्रसादापासून एकही रत्नागिरीकर बचावला नाही. काहींना यात आपले प्राण गमावले, तर अनेक अपघातग्रस्त होत हॅास्पिटलला ॲडमिट झाले आहेत. ट्रॅफिक तासनतास हलत नाही, लहान मुलांना घेऊन  स्त्रियांना या रस्त्यावर टू व्हीलर चालविणे म्हणजे महाभयंकर संकट वाटत आहे. पूर्वी चिखलाचे पाणी कपड्यावर उडण्याचे संकट वाटत होते. आता या रस्ते आणि खड्यात आपला कोणता अवयव नक्की शाबूत राहील का? याची धास्ती असते.
रत्नागिरी आणि डांबर विरघळणारे रस्ते हा विषय गेल्या दोन दशकांतील पूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. या वेळच्या अधिवेशनात तर या डांबरीने पार धुमाकूळ घातल्याच्या चर्चा होत्या; मात्र याचे पडसाद आम्ही रत्नागिरीत यतःकिंचीतही उमटू दिले नाही. हा रत्नागिरीकरांच्या मनाचा मोठेपणा आणि संमजसपणा आपल्या माणसाला सांभाळून घ्यावे ही कोकणी शालिनता आहे; मात्र या पावसाने या शालिनतेच्या पार चिंधड्या उडवत त्याची लक्तरेच शहराच्या रस्त्यावर टांगली आहेत. महाराष्ट्रात आदर्श शहराची कित्येक संकल्पना कलेक्टरसाहेब आपल्याच माहिती यंत्रणा कार्यालयातलून आम्ही ऐकल्या, वाचल्या. गेल्या पूर्ण वर्षभरात आम्ही अगदी चातकासारखे डोळे लावून बसलो होता. रत्नागिरी शहरातील कोट्यवधींचा रस्ता अत्यंत सुंदर, स्वच्छ, खड्डेमुक्त होईल. अगदी चकचकीत गुळगुळीत घसरून पडण्यासाखा होईल, असे काही आम्ही गृहीत नव्हते धरले; परंतु तरीही म्हणतात ना ५०-६० टक्के निधी त्या कामावर खर्च झाला, तर निदान खड्डेमुक्त तरी होईल. आमच्या पोराबाळांना, लेकरांना, आया-बहिणींना, म्हाताऱ्या- कोताऱ्यांना एक किमान सुखाचा प्रवास त्यांच्या त्यांच्या वाहनाने, कधी चालत, कधी सायकलने, रिक्षाने, बसने आणि अगदीच छान परिस्थिती असेल, तर स्वतःच्या कारने; मात्र हा चातक अवतरला पावसाचा धुवांधार अवतार घेऊन आणि रत्नागिरीकरांची पार त्रेधातिरपीट उडाली. ऐन मे अखेरीला रणरणत्या उन्हात काँक्रीटीकरणाचे काम चालू होते. कायम एक रस्ता बंद, त्यातही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डझनभर मंत्र्यांची मांदीयाळीच रत्नागिरी शहरात, पर्यटकांचा तोच हंगाम. त्यामुळे सतत वाहतूक व्यवस्था कोलमडलेली, कायम एक रस्ता बंदच होता. शाळेतल्या मुलांना, त्यांना आणायला जाणाऱ्या आयांना काही वेळा तासनतास थांबावे लागत होते. हे सारे सहन केले रत्नागिरीकरांनी  आनंदाने.. आता गेले दोन दशके डांबर उखडते आहे, तर किमान काँक्रिटच्या रस्त्याचा सुकून अनुभवण्यासाठी तेवढा त्रास सहन केला. कोणी काही बोलले नाही. या काँक्रिटीकरणाला अनेक टीकाकारांनी भ्रष्टाचार, सुमार दर्जा, चुकीची उंची, दुकानात पाणी जाणार, पिण्याची पाईपलाईन गाडली गेली असे एक ना शंभर प्रश्न उपस्थित करत टोकले, असे असताना रत्नागिरीकरांनी उद्याच्या शाश्वत सुखासाठी दुर्लक्ष करत पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य केले.
या काँक्रिटीकरणाच्यानिमित्ताने एक प्रश्न उभा राहीला तो म्हणजे रस्त्याच्यामध्ये २०-२५ मीटरवर ३-४ फुटांची गॅप का ठेवत आहेत? त्यात माती, खडी भरली जात होती. ज्यामुळे गाड्या प्रचंड आपटत होत्या. अपघात होत होते, लोकंचे हात-पाय फ्रॅक्चर होत होते. अखेर त्याला पेव्हर्सने बंद करण्यात आले; मात्र त्या पेव्हर्सखाली बहुदा व्यवस्थित कॅाम्पॅक्शन नसावे त्यामुळे ते पेव्हर खाली आरले आणि पुन्हा खड्डे सुरू झाले. हे होईपर्यंत शेजारच्या साईडपट्या होणे बाकी होते , पुन्हा वाहतुकीची अडचण… नंतर लक्षात आले की येथे आता स्वतंत्र पाण्याची पाईपलाईन टाकणार आहेत.. आता हा निर्णय कधी झाला, तर म्हणे नंतर ठरले… झाली एकदाची पाईपलाईन घालून आणि त्या धुळीच्या रस्त्यातून वाहतूक प्रचंड धुरळा उडवत सुरू झाली. यात आपण दुर्गम खेड्यातून फिरत आहोत की रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणच्या रस्त्यावरून हा प्रश्न अनेकदा पडत होता.. अर्थात तेही रत्नागिरीकरांनी सहन केले…
एव्हाना मे अखेर होत जून महिना सुरू झाला होता. काँक्रिटीकरणाची थडगी वाटोवाट होती…बहुदा ते काम करणारी यंत्रणा रत्नागिरी शहरात काँक्रिटीकरणाचे नव्याने धडे गिरवत होती. कारण हायवेला होणारे काँक्रिटीकरण आणि येथील काँक्रिटीकरण यांच्या तंत्रज्ञान, मशिनरी, कामाची पद्धत आणि कामाचा वेग यात जमीन आस्मानाचा फरक होता. एक पॅच झाला की यंत्रणा गायब होई आणि थेट १५ दिवसांनी उगवे. तोपर्यंत रत्नागिरीकरांचा अंत पाहणार… अर्थात हे ही सहन केले रत्नागिरीकरांनी…
अखेर मारुती मंदिरपर्यंत काही भाग पूर्ण झाला. पावसाची सुरुवात होत होती आणि साईडपट्टीला डांबरीकरण सुरू झाले होते. खाली मातीचा धुरळा उडत होता आणि अत्यंत वेगाने त्यावर हॅाटमिक्स डांबर लेअर पडत होता. काळेभोर डांबर अगदी चकाकणारे… वाऽऽऽ. आम्ही रत्नागिरीकर कसले आनंदीत झालो साहेब… म्हटलं पुढील पाच-दहा वर्ष तरी चिंता नाही… पण निसर्गाच्या मनात आम्हाला हे सुख देण्याचे नव्हते. अगदी पहिल्या पावसाच्या थेंबाबरोबरच हे डांबर उखडू लागले… (बहुदा रत्नागिरीच्या पावसात परकीय शक्ती काही मिसळत असतील त्यामुळे हे डांबर विरघळते) काँक्रीट रस्त्यांच्या मधील पेव्हर्स उडाले म्हणून तेथे ते काढून डांबर टाकले, तर ते पावसाच्या पहिल्या थेंबालाच उडाले. आता पुन्हा डांबर खरवडून तेथे काँक्रिट टाकत आहेत आणि त्यासाठी रस्ते अडविले जात आहेत. मारुती मंदिर सर्कल तर स्विमिंग पूल करावा असे खड्डे आहेत.
जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरीकरांची या डांबरीतून आपण कृपया सुटका करा… हे झारीतील शुक्राचार्य नक्की कोण आहे, हे तुम्हीच शोधू शकता… सध्या नगर पालिका, जिल्हा परिषद साऱ्या यंत्रणेचे प्रशासक आपण आहात… पर्यायाने जिल्ह्यातील प्रत्येक घटनेचे निर्णयाधिकारी आपण आहात. लोकांचा जनक्षेाभ उसळून येत आहे. आपणही हे जाणून आहात. यावर आपण संबंधितांवर कारवाई न करता जनतेला त्यांचे म्हणणे मांडण्यापासून थांबवणे, प्रतिबंध करणे हे या लोकशाहीत जनतेचा  अधिकार डावलणारे आहे. जनक्षोभ व्यक्त करण्यासाठी रत्नागिरीकर मोर्चा धरणे करत आहेत त्यांना थांबविण्यासाठी आपल्या कार्यालयाने ३७(१), (३) आदेश लावून प्रतिबंधात्मक आदेश काढणे, हे अधिकच निषेधार्ह आहे. जनतेला लोकशाही संविधानाने दिलेला अधिकार डावलणारे आहे. त्यापेक्षा या शहराची वाताहात करणाऱ्या नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर आपण का कार्यवाही करत नाही?

– एक रत्नागिरीकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button