
गुहागर : “आजच्या कार्यक्रमानंतर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व आमदारांना एक आदर्श दिला आहे. ही योजना चांगली असून, प्रत्येकानी ही योजना घरोघरी पोहोचवावी. जसा आज तुम्ही या योजनेचा स्वीकार केलात, तसाच भविष्यात आमचाही स्वीकार करावा,” अशी खुली ऑफर पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिली आणि सर्व सभागृहात एकच हशा पिकला.
आमदार जाधव यांना उद्देशून पालकमंत्री सामंत म्हणाले, “पहिल्यावेळी तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर होतात; पण यावेळी तुम्ही कार्यक्रमाला यावे ही नियतीची इच्छा होती. जाधव साहेब तुम्ही या योजनेचा स्वीकार केलात म्हणून मी शासनाच्या वतीने तुमचे जाहीर अभिनंदन करतो.”
दरम्यान सामंत यांनी दिलेली ही खुली ऑफर ऐकून आमदार जाधव यांनी कोपरापासून हात जोडले आणि सभागृहात हास्याचा पाऊस पडला.
“दोन-तीन दिवस तालुक्यात खूप पाऊस कोसळत असून या कार्यक्रमाला मी यावे असे निसर्गाच्या ही मनात होते, असे मिश्किल वक्तव्य पालकमंत्री सामंत यांना प्रत्युत्तर देताना जाधव यांनी केले आणि सभगृहातील उपस्थितांनी त्याला दाद दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण येण्याचा शुभारंभ गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील श्री पूजा हॉलमध्ये पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री सामंत आणि आमदार जाधव एकाच व्यासपीठावर चर्चा करताना दिसले आणि अनेकांच्या भुवया वर झाल्या. सामंत-जाधव यांची ही जवळीक म्हणजे दोन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना अशी दबक्या आवाजातील चर्चाही सभागृहात ऐकू येत होती.



