मुख्य बातमी

संगमेश्वरातील सोनगिरीत भूस्खलन, घरावर दरड कोसळून लाखोंचे नुकसान

संगमेश्वर : तालुक्यातील सोनगिरी पंडितवाडी येथे घराच्या बाजूला असलेल्या डोंगराला भेग जावून भूस्खलन झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत मुश्ताक कापडे यांच्या घरावर दरड कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच घराला तडे गेले असून, घरात चिखल साचल्याने या कुटुंबाला शेजाऱ्यांच्या घरात निवारा देण्यात आला आहे.

रविवारी (२१ जुलै) दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सोनगिरी पंडितवाडी येथील प्रकाश दत्ताराम पंडीत यांच्या घराला तडे गेले आहेत. तसेच सोनगिरी मोहल्ला येथील मुश्ताक कापडे यांच्या घरावर दरड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या घरातील लादी आणि भिंतींनाही तडे गेले आहेत. शिवाय घरात चिखल आणि पाणी साचल्याने हानी झाली आहे. सुदैवाने या घरातील कुटुंबातील कोणालाही दुखापत झाली नाही. वेळीच येथील ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

यावेळी ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले. सोनगिरी गावचे पोलीस पाटील विनेश कृष्णा टाकळे यांना माहिती मिळताच तेथे दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत सुभाष पंडीत, रमेश पंडीत, प्रकाश पंडीत, यासीन सनगे, कासम मयेर, सुलतान हफसानी, फकीर लांबे, चंद्रकांत रसाळ, संदीप रसाळ, सादिक हफसानी, महमद कापडे, अमित खातू, दिनेश खातू, मोहल्ला कमिटीचे उपाध्यक्ष गौसुद्दीन कापडे यांनी तात्काळ मदत करत मुश्ताक कापडे कुटुंबाला बाहेर काढले. या घटनेची माहिती नायब तहसीलदार सुदेश गोताड यांना देताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच मंडळ अधिकारी अमर चाळके, प्रशासक भायनाक, तलाठी संदेश घाग, ग्रामसेवक मीनाक्षी गुरव यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

नायब तहसीलदार गोताड साहेब यांनी तात्काळ मदतीचे आश्वासन दिले आहे. आणि दोन्ही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button