मुख्य बातमी

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर नवी मुंबईत हापूस ९० हजार पेट्या दाखल 

रत्नागिरी : अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील हापूसच्या सुमारे ९० हजार पेट्या दाखल झाल्या असून ५ डझनच्या पेटीचा सर्वाधिक दर २ हजार ३०० रुपये इतका आहे. यंदा हापूसचे दर गतवर्षीपेक्षा कमी असून दुबई बाजारात रत्नागिरी हापूसची पेटी ५ हजार रुपये दराने विकली जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळाली आहे.

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे विशेष मुहूर्त असल्यामुळे कोकणातील बागायतदार या दिवशी हापूस आंबा विक्रीसाठी वाशीला पाठवतात. निर्यातीच्या गोंधळामुळे यंदा हापूसचे दर गतवर्षीपेक्षा कमी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये फेब्रुवारीपासून हापूसची आवक सुरू झाली. सुरवातीला देवगडमधील आंबा अधिक होता; मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात रत्नागिरीमधील आवक वेगाने वाढली. गुढीपाडव्यापासून खऱ्या अर्थाने आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आला. जानेवारीच्या अखेरीस वगळता अवकाळी पावसाचा हापूसला तेवढा फटका बसला नाही. यंदा चार ते पाच टप्प्यांत मोहोर आला असून, उत्पादनही मुबलक आले आहे. सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या मार्केटमध्ये १ लाख पेटी आंबा दाखल झाला. त्यात ४७ हजार पेटी कोकणातील हापूसच्या तर ५३ हजार पेटी या अन्य राज्यातील आंब्याच्या होत्या. गुरूवारी (९ मे) सकाळी अपेक्षेपेक्षा कमी पेट्या वाशीत दाखल झाल्या. गुरूवारी ८२ हजार ६०८ पेटींपैकी कोकणातील ४३ हजार ३३६ तर अन्य राज्यातील ३९ हजार २७२ पेटी आंबा होता. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात आंब्याला मागणी असते. दुबई बाजारात रत्नागि री हापूसची पेटी ५ हजार रुपये दराने विकली जात असल्याची माहिती मिळत आहे.

गतवर्षी हापूसचे उत्पादन कमी होते; मात्र अखेरच्या टप्यात आंबा बाजारात येण्यास सुरवात झाली. यंदा सुरवातीला आणि शेवटी आंबा मोठ्या प्रमाणात राहणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आंबा कमी असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वाशीत अक्षय्य तृतीयेला गेलेल्या पेट्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. त्याचा फायदा हापूसचे दर स्थिरावण्यासाठी होऊ शकतो. दर्जेदार हापूसच्या ६० फळांच्या पेटीला २२०० ते २३०० रुपये दर मिळत आहे.

दरम्यान, आंबा बागायतदार प्रदीप सावंत यांनी मुहूर्त साधून हापूसची आवक वाशी बाजारात सुरू असून, शेवटच्या टप्प्यांत आलेल्या मोहोराचे उत्पादन १५ मे नंतर हाती येईल असे सांगितले. या आठवड्यात उत्पादन कमी आहे; मात्र दर्जेदार आंब्याला दर चांगला मिळत असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button