सीएनजी तुटवड्याबाबत महानगर गॅस कार्यालयावर रिक्षासेनेची धडक

रत्नागिरी : जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षासेना अध्यक्ष तथा आमदार डॉ. राजन साळवी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सीएनजी तुटवाड्याबाबत आज (९ मे) जे. के. फाईल्स येथील महानगर गॅस कार्यालयावर रिक्षासेनेने धडक दिली आणि होणाऱ्या तुटवड्याबाबत माहिती घेतली.
यावेळी महानगर गॅस कार्यालयातील समन्वयक अमोल शिंदे यांच्यासोबत रिक्षासेना जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कदम, शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी चर्चा करून माहिती घेतली. झालेल्या चर्चेनुसार त्यांनी गॅस ठरलेल्या कोट्यापेक्षा कमी येत असल्याचे सांगत तो वाढवून मिळावा म्हणून त्यांनी गेल कंपनीला पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. तसेच केलेल्या पत्रव्यवहाराची झेरॉक्स कॉपी देण्याचे कबूल केले. या पत्रव्यवहाराची झेरॉक्स कॉपी मिळताच आमदार डॉ. राजन साळवी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे रिक्षासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी रिक्षासेनेचे मिलिंद हातपले, सुरज मालगुंडकर, किशोर कदम, रामा आंबेकर, समीर सावंत, योगेश पानगले, सचिन लाखण, नीलेश तोडणकर व अन्य रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.



