मुख्य बातमीसाहित्य-कला

राज्यस्तरीय नाट्यगीत स्पर्धेत रत्नागिरीची तन्वी मोरे द्वितीय

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे 'जागर नाट्यकलेचा' महोत्सव

रत्नागिरी : शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या नाट्यगीत गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या तन्वी मंगेश मोरेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून रत्नागिरीची मोहोर उमटवली. या स्पर्धेची अंतिम फेरी माटुंगा (मुंबई) येथील यशवंत नाट्यगृहाच्या रंगमंचावर राज्यभरातील २१ स्पर्धकांमध्ये झाली.
शतकमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रभर ‘नाट्यकलेचा जागर’ या महोत्सवाचे नियोजन केले आहे. यामध्ये एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यपद गायन, नाट्यछटा आणि नाट्य अभिवाचन अशा विभिन्न ६ स्पर्धांचा समावेश होता. नाट्यगीत गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यभरातील एकूण २२ केंद्रांवर झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची मिळून प्राथमिक फेरी रत्नागिरीत येथे झाली. या केंद्रातून तन्वी मोरे हिची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. ६ मे रोजी माटुंगा येथे अंतिम फेरी झाली. राज्यभरातील २१ स्पर्धकांमध्ये ही फेरी अत्यंत चुरशीची झाली. तन्वीने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
अंतिम फेरीसाठी ज्ञानेश पेंढारकर, शुभदा दादरकर आणि मधुवंती दांडेकर या ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध रंगकर्मी गायक कलाकारांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी सिनेकलाकार आणि नाट्यपरिषदेचे पदाधिकारी विजय गोखले, सविता मालपेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नाट्यगीत गायन स्पर्धेतील विजेत्या कलाकारांचा एक कार्यक्रम मुंबईत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी परीक्षक शुभदा दादरकर यांनी दिले. स्पर्धेत तन्वीसोबत सार्थक बाविकर (कोल्हापूर), रिदम पाटील (लातूर), ओंकार पाटील (कोल्हापूर), वेद मुळे (बीड), तनय नाझीरकर (पुणे), राधा ठेंगडी (नागपूर), विकास चव्हाण (अहमदनगर) यांनी यश संपादन केले.
तन्वीने मिळविलेल्या यशाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे समीर इंदुलकर यांनी तसेच तिच्या गुरू विनया परब यांच्यासह अनेकांनी तिचे आणि तिच्या पालकांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button