मुख्य बातमी

रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयात पहिले देहदान

रत्नागिरी : दिगंबर साठे यांचे रविवारी (२२ डिसेंबर) रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभागात त्यांची पत्नी स्नेहल साठे व मुलगी छाया साठे यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोग व्हावा या इच्छेने दिवंगत साठे यांचा देह दान केला.
दिवंगत दिगंबर लक्ष्मण साठे (६५, वर्ष, रा. पऱ्याची आळी) यांच्या पत्नी स्नेहल साठे व त्यांची मुलगी छाया साठे यांनी १८ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महविद्यालयात येऊन देहदानाचा संकल्प केला होता.
देहदानाचे महत्त्व : शरीररचना शास्त्र विभागामध्ये आलेल्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण तसेच संशोधन यासाठी केला जातो. या संपूर्ण प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव व विभागातील कर्मचारी यांनी देहदान व त्यानंतरची प्रकिया पूर्ण केली. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचे देखील सहकार्य मिळाले.
अधिष्ठाता डॉ. रामानंद व डॉ. सय्यद यांनी देहदान संकल्प करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button