मुख्य बातमीराजकीय

प्रकल्पांच्या नावाखाली जमिनी हडपण्याचा राणे यांचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही : खा. राऊत

रत्नागिरी : “आमचा विरोध हा प्रकल्प आणायला नसू, कोकणाला उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणि अश्या प्रकल्पांच्या नावाखाली बकासुरी वृत्तीने बळकवण्यात येणाऱ्या जमिनीला आमचा विरोध आहे व तो कायम राहील. प्रकल्पांच्या नावाखाली कोकणातील जनतेच्या जमिनी हडपण्याचा नारायण राणे यांचा प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही,” असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आज (२५ एप्रिल) हरचेरी व नाचणे जिल्हा परिषद गटाचा मेळावा नाचणे येथील बालाजी मंगल कार्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना श्री. राऊत म्हणाले, “त्यांनी कधीच सामंत कुटुंबियांचा अवमान केला नाही किंवा असंस्कृत, असंसदीय शब्दात त्यांचा उद्धार केला नाही; परंतु भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी ते केले. स्वतः राणे केंद्रात उद्योग खात्याशी निगडीत असलेले खाते सांभाळत असताना रत्नागिरीत उद्योग-धंदे बंद झाले असे जेव्हा सांगतात तेव्हा ते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निष्क्रियेतेवर बोट ठेवत आहेत.”
श्री. राऊत पुढे म्हणाले, “९ राजकीय हत्त्यांचा ज्यांच्यावर आरोप होतो, अश्या व्यक्तीला भाजपने येथून उमेदवारी दिली आहे. आता आपण ठरवायचे आहे की अश्या व्यक्तीला आपण आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवणार का..? आमचा विरोध हा प्रकल्प आणायला नसू, कोकणाला उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणि अश्या प्रकल्पांच्या नावाखाली बकासुरी वृत्तीने बळकवण्यात येणाऱ्या जमिनीला आमचा विरोध आहे व तो कायम राहील. त्याचप्रमाणे जे राणे जमीन दिली नाही तर हातपाय तोडण्याची भाषा करतात त्यांना आम्ही येथे आहोत तोवर हे शक्य नाही.”
यावेळी श्री. राऊत यांनी सिडको आणि एनआरसीबाबत लोकांना जागृत केले. राणे कुटुंबीय हे जाती धर्मात, द्वेष निर्माण करत आहेत, कौटुंबिक द्वेष निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अश्या प्रवृत्तीला रोखायचे असेल तर ७ मे रोजी मशाल चिन्हासमोरील बटण दाबण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
या प्रसंगी युवासेना शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंडयाशेठ साळवी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बशीरभाई मुर्तूझा, काँग्रेसच्या न्याय व विधी शाखेच्या अॅड. अश्विनी आगाशे, मुश्ताक मुल्ला, हरचेरी विभागप्रमुख महेंद्र झापडेकर, शेखर घोसाळे, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, माजी शहरप्रमुख प्रमोद शेरे, रिझवाना शेख, संजय साळवी, दुर्गेश साळवी, युवासेना रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, रिजवाना शेख, ममता जोशी, साक्षी रावणंग, सायली पवार, कॉँग्रेस प्रदेश ओबीसी सेलचे दीपक राऊत, आबा घोसाळे आदी इंडिया आघाडीचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button