गद्दारांचे दिवस संपलेत, भाजपने त्यांना जागा दाखवली : माजी खासदार विनायक राऊत

रत्नागिरी : डावोसला जाऊन महाराष्ट्राच्या, कोकणाच्या, रत्नागिराच्या हितासाठी उद्योग आणण्याच्या बहाण्याने उद्योगमंत्री उदय सामंत गेलेत. पण त्याठिकाणी गेलेले असतानासुध्दा उद्योगपतींशी चर्चा करायची सोडून त्यांना गद्दारी भाषा करावी लागतेय हे दुर्दैव आहे. तेथे जाऊन पक्ष फोडण्याची भाषा करताना काँग्रेस, ठाकरे सेनेतून किती फोडणार ही तुमची मर्दूमकी असेल तर ती सामंत यांची नामर्दूमकीची लक्षण आहे. आता गद्दारांचे दिवस संपत आलेत, कारण भाजप नेत्यांनी त्यांना जागा दाखवायला सुरूवात केलेली असल्याची टीका ठाकरे शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राउत यांनी केली आहे.
रत्नागिरी येथील आपल्या संपर्क कार्यालयात राऊत यांनी आज (२२ जानेवारी) दुपारी पत्रकारांशी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर खरमरीत टीका केली. उद्योगमंत्री उदय सामंत हे राज्याला मिळालेत पण ते दुर्दैव आहे. ज्या विषयासाठी डावोसला गेलेत, त्या विषयावर बोलायचे सोडून ते गद्दार किती होते, बेइमानीला आपण किती खतपाणी घालतोय अशी दुहेरी स्वप्न पाहताहेत. अशा उद्योगमंत्र्यांच्या बुद्धीची कीव करावीसी वाटत असल्याचे विनायक राऊत म्हणाले.
रत्नागिरीत १७ हजार कोटींचा प्रकल्प येणार असे सामंत हे म्हणताहेत. पण तो प्रोजेक्ट येईल न येईल ते आता सोडून द्या, कारण रत्नागिरी विमानतळ करता करता ते थकून गेलेत असाही टोला राऊत यांनी लगावला. केवळ आणि केवळ बतावण्या करायाच्या, थापा मारायच्या यापलीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय केले हे दाखवून देण्याची आवश्यकता असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.
डावोसला राज्य सरकाराच्या खर्चाने दौरे करताय तर त्या पैशांचा विनियोग करायचा असेल तर राज्याच्या हिताच्या दृष्टीने तेथे चर्चा करावी. पण तेथे जाऊन पक्ष फोडायची भाषा करू नये. कारण आता शिंदे गद्दारांचे दिवस संपत आलेत. भाजपाने त्यांची जागा दाखवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आतासुध्दा दोन पालकमंत्री पदांना स्थगिती देऊन भाजपाने जे हवे ते केले आहे. यांना आता काडीमात्र किंमत देत नसल्याची खिल्ली विनायक राऊत यांनी उडवली आहे.
एकनाथ शिंदे गटाला भाजपा वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. नवा उदय वैगेरे कोणी नाही. त्यामुळे त्यांना वास लागला होता, हे पद आता नाकारून चालणार नाही, म्हणून उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याया नव्हता.
शिंदेंची जागा उदय सामंत घेत असल्याची जोरदार चर्चा होत असल्याच्या विषयावर राऊत यांनी गुगली टाकली आहे. उदय सामंत यांची त्यामध्ये मास्टरकी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत हे जे बोलले आहेत, त्यात तथ्य आहे. कारण काही दिवसांतच १०० टक्के खरं आहे ते समोर येईल, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.



