मुख्य बातमी

बांधकाम व्यावसायिक दिनकर सावंत यांची एसीबी कार्यालयात चौकशी

रत्नागिरी : माजी आमदार राजन साळवी यांच्यामागचा एसीबीचा चौकशीचा ससेमिरा अजून संपलेला नाही. त्यांचे पुत्र शुभम साळवी यांचे व्यावसायिक भागीदार रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिनकर सावंत यांची आज (२२ जानेवारी) एसीबी कार्यालयात चौकशी झाली. निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा माजी आमदार राजन साळवी यांना लक्ष्य करण्यात आले असून, त्यांच्या व्यवसायात भागीदार असणार्‍यांची आता चौकशा सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांच्यामागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. त्यांचा मुलगा आणि पुतण्यांच्या बांधकाम व्यवसायातील भागीदार दिनकर सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यांना बुधवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते

दिनकर सावंत हे २२ जानेवारी रोजी रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीला सामोरे गेले आहेत. रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर संबंधित बांधकाम साईट आहे. एसीबीने जी नोटीस पाठवली आहे. त्यात ‘या’ साईटचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी याचा एसीबीने जबाब नोंदवला होता. आता त्यांचे व्यावसायिक भागीदार दिनकर उर्फ दिनू सावंत यांची चौकशी करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी सावंत यांनी एसीबीची नोटीस स्विकारली होती. रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेसिंगचे सावंत आणि साळवी कुटुंबाने एकत्र काम केले होते. शुभम साळवी यांनी दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत यांची चौकशी झाली.

दिनकर सावंत यांना साळवी कुटुंबासोबत भागिदार म्हणून असताना टेंडर फाईल आणि इतर कागदपत्रे एससीबीने मागवली आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता दिनकर सावंत हे एससीबी कार्यालयात दाखल झाले.

एसीबीने दिलेल्या नोटीसमध्ये साळवी कुटुंबियांविरोधातील गुन्ह्याचा उल्लेख आहे. राजन प्रभाकर साळवी, त्यांची पत्नी अनुजा राजन साळवी आणि मुलगा शुभम राजन साळवी यांच्याविरुद्ध १८ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमचे कलम १३(१) (ब) सह १३(२) व कलम १२ प्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल केल्याचे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button