चक्रभेदी संस्थेच्या वैदेही सावंत यांच्या कर्तृत्वाचा पद्मश्री कल्पना सरोज यांच्या हस्ते ‘ममता पुरस्कारा’ने गौरव

रत्नागिरी :-सुप्रसिद्ध उद्योजिका ‘पद्मश्री’ श्रीमती कल्पना सरोज यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण महानगर टेलिफोन निगम कामगार संघाद्वारे स्थापन झालेल्या ‘जाणीव’ न्यासाद्वारे, प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादर येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जाणीवेची जाण’ ठेवण्याचा विचार देणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारातून ‘जाणीव न्यास’ उभा आहे. वात्सल्यमूर्ती माँसाहेब मीनाताई ठाकरे या करुणा आणि दयेचा सागर होत्या. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या पाठीशी त्या समर्पित भावनेने उभ्या राहिल्या. त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांना ‘माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे ममता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते.यापूर्वी जागतिक महिला दिन” साजरा करून महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणा-या महिलांचा “स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे ममता पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येतो.
याआधी याच न्यासाच्या माध्यमातून आदरणीय विजया वाड,महाराष्ट्रातील विकलांग व्यक्तीसाठी काम करणा-या नसीमा हूर्जूक तसेच आदिवासी व ग्रामीण भागात काम करणा-या श्रीमती कविता गोभाडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
यावर्षी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्यिक आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत प्रसिद्धीपासून दूर राहून तळागाळात काम करणाऱ्या महिलांना ‘ममता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या ख्यातनाम उद्योजिका पद्मश्री कल्पना सरोज यांनी दोन रुपये रोजंदारीपासून ‘कमानी इंडस्ट्रीज’च्या मालक होण्यापर्यंतचा आपला प्रेरणादायी प्रवास कथन केला.
काहीही करून मरायचं तर काहीतरी करून जगायचं का नाही?” असा स्फूर्तिदायी विचार व्यक्त करत त्यांनी आपल्या संघर्षाची गाथा मांडली.
देवरुख, रत्नागिरीच्या चक्रभेदी संस्थेच्या अध्यक्षा वैदेही सावंत या एम.ए.मराठी व शिक्षण,एम.फिल बी.एड. असून त्यानी यशदा पुणे व NIRD हैद्राबाद संस्थेची स्टेट मास्टर ट्रेनर म्हणून गेली १२ वर्षे महाराष्ट्र राज्यात क्लासवन ऑफिसर व लोकप्रतिनिधी यांना ट्रेनिंग दिले आहे त्याच बरोबर गेली २२ वर्षे समाज सेवेचे कार्य करत आहे. त्यासाठी त्यांना १३ पुरस्कार आहेत त्यातील ४राज्यस्तरीय पुरस्कार आहेत.तसेच महाराष्ट्रातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील BDO CDPO, पंचायत समिती सभापती व सदस्य जिल्हापरिषद अध्यक्ष व सदस्य विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, सरपंच,ग्रामसेवक, मुख्याध्यापक बचतगट अध्यक्ष, सचिव अशा विविध घटकांना जवळपास 80 हजारहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे.
त्या ज्ञान व अनुभवाचा खऱ्या अर्थाने समाजाला उपयोग व्हावा या उद्देशाने त्यांनी चक्रभेदी सोशल फौंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.ही संस्था विधवा व एकल महिला सोबत तसेच पर्यावरण या विषयावर काम करत आहे. विधवा महिलांचे हळदी-कुंकू, शिव्या मुक्त समाज अभियान, शेअरिंग व केअरिंग, जीवन कौशल्य कार्यशाळा तसेच विधवा महिलाना समाजात मान-सन्मान मिळवून देणें व त्याना आर्थिक सक्षम बनवणे त्यांच्यासाठी मायेचं हक्काचं घर ” निवारा केंद्र यासाठी काम करत आहे.पण यासाठी त्यांना कोठूनही निधी नाही.
त्यांनी सात महिलांना रोजगारासाठी टी स्टॉल शॉपसाठी लागणारे जवळपास एक लाखाचे साहित्य व स्टेनलेस स्टीलची गाडी त्यांना पुर्ण मोफत दिली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत उदा. वह्या, छत्री, दप्तर, गणवेष,रेनकोट इ. मदत केली आहे. त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या अडचणी/समस्या समजून घेतल्या आहेत संस्थेला ५०० महिलांच्या विविध समस्या सोडवण्यात यश आले आले आहे.
राज्य स्तरावर तसेच प्रत्येक जिल्हा, तालुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, ग्रामपंचायत निहाय्य होणा-या आराखड्यामध्ये निराधार, विधवा, एकल महिलांसाठी खास निधीची तरतूद करुन त्यांच्याविषयी नाविन्यपूर्ण योजना आखाव्यात
• बालसंगोपन योजनेची रक्कम प्रत्येक महिन्याला मिळावी.
• संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे ती ५०००/-रुपये व्हावी तसेच ती नियमित मिळावी.
• विधवा अनिष्ठ प्रथा बंद करण्याचा १७/०५/२०२२ च्या शासन निर्णयानुसार अमलबजावणी होऊन प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत या ठिकाणी प्रबोधनाचे उपक्रम घेऊन जाणीव जागृती केली जावी.
•विधवा व एकल महिलांकडे पाहण्याचा समाजाचा विशेषतः पुरुषांचा दृष्टीकोन वाईट असतो तर त्यांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीव जागृतीचे गावागावात वाडी वाडीत कार्यक्रम करण्यात यावेत.
जी विधवा महिला आर्थिक अथवा इतर विवंचनेपोटी दुसऱ्या महिलेचे नुकसान करत असेल वाईट मार्गाला जात असेल तर तिचेही समुपदेशन करण्याची सोय असावी.
ज्या निराधार आहेत व त्यांचे वय ५५ च्या पुढे आहे त्यांची पाणी पट्टी व घर पट्टी माफ व्हावी.यासाठी त्या अविरतपणे विना मोबदला काम करत आहेत
पर्यावरण, शिव्या मुक्त समाज अभियान, व्यभीचार मुक्त समाज अभियान इ. नावीन्य पूर्ण उपक्रम राबवत आहेत याची दखल घेऊन त्यांना”ममता गौरव पुरस्कार २०२६”देऊन गौरविण्यात आले.
सेवानिवृत्तीनंतर दिव्यांग मुले व वृद्धांची सेवा करणाऱ्या श्रीमती अनिता नारकर, राजकीय क्षेत्रातील युवा महिला नेतृत्व कु. प्रियंका जोशी, साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती सुरेखा गावंडे व श्रीमती लक्ष्मी जाधव यांना ‘ममता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तसेच सैनिकी स्कूलच्या प्रवेश परीक्षेत देशात प्रथम येणाऱ्या पाचवीतील चिमुकली अनुराधा बुधवंत हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सर्व कर्तृत्ववान मानकरी महिलांना रोख रक्कम, साडी-चोळी, शाल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून दक्षिण मुंबईतील नवनिर्वाचित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, तसेच पद्मजा चेंबुरकर, आबोली खाडे, संपदा मयेकर, सुप्रिया वाळवी, उर्मिला पांचाळ आणि स्वीकृत नगरसेविका माधुरी मांजरेकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात इराणमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप मुलींना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांनी संगीतमय वाद्यवृंदाचा आनंद लुटला. हा सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीच्या जिद्दीचा आणि संघर्षाचा सन्मान ठरला.
कार्यक्रमाला संस्थेच्या दीपिका कदम, दिपाली गावडे, अरुता अडविलकर, आर्यन झगडे उपस्थित होते.



