शिवराय ते भिमराय समता मार्चच्या ९व्या वर्षीच्या कार्यक्रमात तुषार गांधी यांचे नागरिकांना क्रांतीकारी आवाहन व राज्य सरकारवर घणाघाती प्रहार

विविध जनसंघटना व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने दरवर्षी महाडमध्ये १९ मार्च रोजी शिवराय ते भिमराय समता मार्च काढण्यात येतो.
हे या उपक्रमाचे नववे वर्ष आहे. तसेच चवदार तळ्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाला यंदा ९९ वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने गाडीतळ या जागेवर जिथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी १९२७ साली सत्याग्रहाच्या एक दिवस आधी म्हणजे १९ मार्च रोजी घेतलेल्या परिषदेच्या मुळ स्थळावर सदर सभा आयोजित करण्यात आली होती.
१९२७ नंतर पहिल्यांदाच या जागेवर अशी सभा झाली. या सभेला मा. तुषार गांधी ( महात्मा गांधींचे पणतू) , मा. लक्ष्मीकांत देशमुख, निवृत्त प्रशासकीय अधिकारी व साहित्यिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन होत्या.
या सभेला संबोधित करताना मा.तुषार गांधी यांनी परखड विचार मांडले.
“डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले. पण 2014 मध्ये डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलून मनुस्मृतीचे राज्य आणण्याची भाषा करीत केंद्रात सत्ता काबिज केली. ज्यांनी कायम जुमलेबाज म्हणून ओळख निर्माण करताना पहिला जुमला पूर्ण करण्याच्या आधीच दुसरा जुमला जनतेला देऊन भुलथापा मारल्या. त्यांचे अनुयायी उद्या महाड शहरात येऊन भूलथापा देतील. आता आंबेडकरी अनुयायांनीच नव्हे तर स्वातंत्र्याचा विचार ज्यांना पटला आहे. ज्यांना संविधानाचा विचार पटला आहे, अशांनी आता आंदोलनाचा , क्रांतीचा पवित्रा घेण्याची गरज आहे.
त्यामुळे चवदारतळे सत्याग्रहाच्या 100 व्या वर्धापनाचे वर्ष क्रांतीचे वर्ष मानून सर्वांनी आपआपल्या परीने योगदान देण्याची गरज असल्याचे आवाहन महात्मा गांधीजींचे पणतू ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक तुषार गांधी यांनी केले.
‘शिवराय ते भिमराय समता मार्च’च्या सांगतेप्रसंगी गाडीतळ परिषदेतर्फे चवदारतळे सत्याग्रहाच्या २० मार्च २०२७ ह्या शंभराव्या वर्धापन दिनाला ‘विश्वक्रांती दिवस’ म्हणून घोषित करण्यात यावं असे आवाहन करण्यात आले .
याप्रसंगी माजी आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, परिवर्तनवादी साहित्यिक अभय कांता, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, सुरबानाना टिपणीसांचे नातू मिलींद टिपणीस, नागेश जाधव, तुळशीराम हाटे गुरुजी, प्रा. दीपक क्षीरसागर तसेच अन्य मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी तुषार गांधी यांनी पुढे बोलताना, ज्या समतेचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला ती खरोखर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला.
संविधानाच्या प्रत्येक विचारांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राणप्रतिष्ठापना केली असून तिच आपल्या देशाचा आत्मा आहे. तो आत्मा गुलाम, लाचार करू नका अथवा हत्याही करून देऊ नका, असे आवाहन केले.
यावेळी माजी आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी, डॉ. बाबासाहेबांना नवयान बुध्द धम्माचे अनुयायी करायचे होते कारण गौतम बुध्दांचा धम्म विज्ञाननिष्ठ, परिवर्तनशील विचार-वर्तनाचे मार्गदर्शन करणारा आहे. बाबासाहेबांना आयुष्य कमी मिळाले म्हणून त्यांना स्वतःच्या समाजाखेरिज धम्मविस्तार करता आला नाही. केवळ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशासह काही भागातील जनता नवबौध्द म्हणून सामील झाली अन्यथा संपूर्ण भारत बुध्दमय करण्याचे त्यांचे स्वप्न होते. धर्मांतर नाही केले तरी गौतम बुध्दांचा धम्म विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये आणलेल्या नवयानाची जीवनपध्दती आत्मसात करण्यानेदेखील आपण चांगल्यापध्दतीने अनुयायी होऊ शकतो, असे विचार मांडले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना नागेश जाधव यांनी केली. प्रारंभी मिलींद टिपणीस यांनी भाषणाद्वारे, चवदार तळे सत्याग्रहाच्या आधीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत गाडीतळावर झालेल्या परिषदेच्या आणि त्यानंतर झालेल्या सत्याग्रहाच्या आठवणी जाग्या केल्या. सदर घटनेनंतर सनातनी मंडळींनी केलेल्या हल्ल्याचे अनुभव मांडले.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी, शिवरायांनी लोकशाही ची संकल्पना अस्तित्वात नसलेल्या त्यांच्या काळात रयतेचे राज्य अशी संकल्पना मांडली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात ” आम्ही भारताचे लोक” अशी सुरुवात असणे हे दोन मानबिंदू लक्षात घेऊन शिवराय ते भिमराय समता मार्चचे आयोजन करण्यात येत आहे, तसेच हा कार्यक्रम केवळ एक जातीयांचा राहू नये, हा मानव मुक्ती चा संगर असल्याने सर्वजातीय, सर्वधर्मीय नागरिकांनी तो साजरा करून अन्यायाविरुद्ध, विषमतेविरूद्ध लढण्याचा निर्धार करावा यासाठीच हा समता मार्च असल्याचे मांडले.
उल्का महाजन यांनी तीन महत्त्वाचे ठराव मांडले.
* डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मधील नाट्यगृहाला सुरबानाना टिपणीस यांचे नाव तसेच बहुउद्देशीय सभागृहाला अनंत चित्रे यांचे नाव देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने २००७ साली केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी.
* गोविंद निवास या टिपणीसांच्या घराचा जीर्णोद्धार करण्यासाठी शासनातर्फे तरतूद करण्यात आलेले ९५ लाख रुपये वापरण्यात यावे.
* गाडीतळावरील जागा शासनाने ऐतिहासिक परिषदेचे ठिकाण म्हणून जतन करावे, तेथे या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या स्मृती मांडणारे प्रदर्शन व मंच उभारण्यात यावे.
या तिन्ही ठरावांना उपस्थितांनी हात उंचावून मंजुरी दिली यावेळी नागेश जाधव यांच्या भारतीय चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे तपशील मांडणा-या विवेचनात्मक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
अभय कांता यांनी ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा दया पवार यांची कविता वाचून दाखवली.
एल्गार गटाद्वारे व गंगाधर साळवी यांनी अनेक प्रेरणादायी गीते सादर केली.



