भाट्ये किनारी कासवाची पिल्ले झेपावली समुद्राकडे

रत्नागिरी : शहाराजवळील भाट्ये समुद्रकिनारी संवर्धित केलेल्या कासवाच्या अंड्यातून आज ८४ पिल्ले समुद्राकडे झेपावली. कासवमित्र समीर भाटकर, भाट्ये ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश पाटील, उद्योजक जितेंद्र शिंदे, माजी सरपंच पराग भाटकर, झरी विनायक मित्रमंडळाचे पप्या भाटकर, भूषण भाटकर, हॉटेल मसाला किचनचे मालक अभि सुर्वे, पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी ही कासवाची पिल्ले समुद्रात सोडली.
झरी विनायक मंदिराचे पुजारी व कासव मित्र समीर नंदकुमार भाटकर यांनी २९ फेब्रुवारीला पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर एक कासव अंडी घालत असल्याचे निदर्शनाला आले आणि त्यांनी तात्काळ भाट्ये गावच्या सरपंच प्रीती भाटकर, उपसरपंच राजेश पाटील तसेच ग्रामस्थांना याची कल्पना दिली. त्यानंतर भाट्ये ग्रामस्थांनी झरी विनायक मंदिराजवळ प्राणी मित्रांना बोलवून घेतले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १४१ अंड्याचे संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली होती. आज ही पिल्ले समुद्राच्या कुशीत जाण्यासाठी सज्ज झाली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी १०८ कासवाची अंडी याच ठिकाणी घातली गेली होती. भाट्ये किनारी ही कासव संवर्धन मोहीम ग्रामपंचायतीने हाती घेतली असून, ज्या ठिकाणी कासवांची अंडी घातलेली आहे, तेथे जाळी लावून ती संरक्षित केली आहेत. यापुढे आता भाट्ये समुद्रकिनारी कासव संवर्धन केंद्र होणार असून, ग्रामस्थांच्या पुढारकारांनी कासवाच्या अंड्यांना संरक्षण दिले जाणार आहे. यापुढेही आता कासवांच्या अंड्यांच्या, तसेच कासव पिले संवर्धनासाठी या गावातील लोकांनी पुढे येण्याचे ठरवले आहे.



