जिल्ह्यात १८ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी : दिनांक ४ एप्रिल दुपारी १२ ते १८ एप्रिल २०२४ रात्री १२ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केला आहे.
१२ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत मुस्लिम धर्मीयांचा रमजान सण, तसेच ९ एप्रिलला गुढीपाडवा, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच १७ एप्रिलला श्रीराम नवमी हे सण साजरा होणार आहेत. १६ मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले जाते. तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ मुंबई-गोवाचे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार आहेत. अशावेळी आंदोलनकर्त्यच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७(१)(३) सन १९५१चा कायदा २२वा नुसार ४ एप्रिलला दुपारी बारा वाजल्यापासून ते १८ एप्रिलला रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे.
या आदेशान्वये या कालावधीत शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सूरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर नीती याविरुध्द अशी किंवा शंतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे, इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे ही कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यासही मनाई आहे.
अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम आदी, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच आदींना हे प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणूक तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करायचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे आणि अशी परवानगी घेतल्यानंतरच प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.



