मुख्य बातमी

लाखोंचे दागिने असलेली पर्स मालकांला दिली परत

रुणकर दाम्पत्याचा प्रामाणिकपणा

रत्नागिरी : शहरातील जे. के. फाईल्स कंपनीजवळ भल्या पहाटे रस्त्यावर पडलेली लाखो रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज असलेली पर्स सोमनाथ रुणकर व त्यांची पत्नी सौ. गीता रुणकर यांनी काही मिनिटांतच मूळ मालकाला परत करून माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जीवंत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्यावर रत्नागिरीकर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
शहारातील खालची आळी परिसरात राहणारे सोमनाथ रुणकर हे दैनिक सागरमध्ये जाहिरात विभागात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. रविवारी पहाटे ते पत्नी सौ. गीता यांच्यासह मुंबई येथे जाण्यासाठी खालची आळी येथून रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे कारने निघाले होते. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी नव्हती. ते जे. के. फाईल्स दरम्याने आले असताना कंपनीच्या बाहेर मुख्य रस्त्यावर त्यांना एक पिशवी दिसली. त्यांनी कारचा वेग कमी करून त्या पिशवीवरून अलगद गाडी पुढे घेतली, मात्र कोणाची तरी महत्त्वाची पिशवी असेल यामुळे त्यांनी कार थांबवली आणि पिशवीजवळ गेले; मात्र ती पिशवी नसून पर्स असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ती पर्स घेवून रुणकर पती-पत्नी कारमध्ये बसले. श्री. रुणकर यांच्या सुचनेवरून सौ. गीता यांनी आतमध्ये पर्स मालकाची ओळख दर्शविनारे कागदपत्र आहेत का, याची तपासणी केली. यावेळी त्यांना एका महिलेचे आधार कार्ड दिसले. मात्र त्या आधार कार्डवरील असलेला मोबाईल क्रमांकावर फोन लागत नव्हता. त्यामुळे रुणकर दाम्पंत्याने रेल्वे स्थानकात जाऊन पोलिसांकडे पर्स देवून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. ते रेल्वे स्थानकाजवळ पोहचत असतानाच पर्समधील मोबाईलवर एक फोन आला. तो फोन तात्काळ श्री. रुणकर यांनी उचलला.
‘हॅलो…… मी कालेकर…. बोलतेय, माझी पर्स तुम्हाला मिळीली आहे का?’ या सौ. कालेकर यांच्या वाक्यावर होय असे श्री. रुणकर यांनी सांगताच त्या महिलेला मोठा दिलासा मिळाला. मोबाईलवरील संभाषणात श्री. रुणकर यांनी आपण रेल्वे स्थानकात जात असल्याचे सांगितले. पर्स शोधण्यासाठी रत्नागिरीकडे निघालेल्या सौ. कालेकर यांनी पुन्हा रेल्वे स्थानक गाठले. समोर उभ्या असलेल्या पती-पत्नीकडे आपली लाखो रुपयांचे दागिने असलेली पर्स दिसताच सौ. कालेकर यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पर्स हातात घेत रुणकर दाम्पंत्याचे पाय धरले. मंगळसूत्रासह अन्य सोन्याचे दागिने, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे त्यात असल्याचे सौ. कालेकर यांनी सांगितले.
सौ. कालेकर या आंबेशेत येथील आपल्या नातेवाईकांकडे पालखी सोहोळ्यासाठी आल्या होत्या. सोहोळा अटपून रविवारी सकाळी त्या रेल्वेने मुंबईकडे जायला निघाल्या होत्या. आपली पर्स त्यांनी रिक्षाचा मागील बाजूला ठेवली होती; मात्र रिक्षाच्या मागील बाजूचे कापड फटलेले असल्याने भरधाव वेगात पर्स रिक्षातून बाहेर पडली. त्यानंतर काही वेळाने या मार्गावरून जाताना रुणकर दाम्पत्याला ती पर्स रस्त्यात मिळाली. ती त्यांनी मूळ मालकाला परत केली. श्री. रुणकर दाम्पत्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button