मुख्य बातमी

‘छत्रपतींच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प शिवजयंतीनिमित्त करा’ : अभिजीत हेगशेट्ये

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील शिवजयंती उत्साहात

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलताना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये. शेजारी प्रा. प्रकाश पालांडे, प्रा. ताराचंद ढोबळे, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, प्रा. सुकुमार शिंदे.

रत्नागिरी : ‘त्याकाळात छत्रपती शिवाजी महाराजांकडे तलवार होती, आज तुमच्याकडे संगणक आहे, समाज माध्यम आहे. तंत्रज्ञान प्रगतिशील आणि विचार प्रतिगामी असे न करता छत्रपतींच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने करा’, असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी केले.
संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) यांच्या वतीने महाविद्यालयात आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालायच्या प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. ताराचंद ढोबळे, प्रा. प्रकाश पालांडे उपस्थित होते.
या वेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री. हेगशेट्ये म्हणाले की, ‘मी छत्रपतींना आजच्या म्हणजेच २०२४ मधून बघण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्रिटिश माणूस नजराणा घेऊन आला होता. कारण त्याला माहिती होते की भारतखंडाचा जर कर्ताकरविता कोणी असेल तर ते शिवाजी महाराज होते. मुघल साम्राज्य होते. मात्र त्यांनी केवळ सम्राज्यशाही केली, राज्य उपभोगले पण विचार नाही आणला. तो छत्रपतींनी आणला आणि तो विचार होता प्रगतिशीलतचा, मानवतेचा. हा विचार आम्ही जपणे आणि पुढे घेऊन गरजेचे आहे. रायतेच्या राज्यात कोणी कोणाचा द्वेष करायचा नाही, हे सांगतानाच त्यांनी जात, पंथ, धर्म यांच्या पलीकडे असलेला मानवतेचा विचार त्यांनी लोकांना दिला आणि तो राबविला. त्यांचीच माणसे त्यांची शत्रू होती, मात्र या सगळ्यांना घेऊन पुढे जाताना त्यांनी एक व्यापक विचार मांडला, त्याप्रमाणे ते वागले आणि म्हणूनच आज ४०० वर्षांनंतही त्यांची आठवण आपण काढतो. जगातील उत्तम कौशल्य व्यवस्थापन त्यांच्याकडे होते. आज आमचे आयुष्य जात, धर्म, स्त्री-पुरुष, लिंगभेद यात निघून जात आहे आणि म्हणून आम्ही काहीच निर्माणाच्या गोष्टी करत नाही. आज आम्हाला मंदिर, मशीद यात गुरफटवले जात असून आमचे विचार खुंटावले जात आहेत. त्यामुळे विचाराने जगणे आणि विचाराने वागणे महत्त्वाचे आहे.’

मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ. आशा जगदाळे. शेजारी प्रा. प्रकाश पालांडे, प्रा. ताराचंद ढोबळे, संस्थाध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि प्रा. सुकुमार शिंदे.

प्राचार्या डॉ. सौ. जगदाळे म्हणाल्या की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वाचले तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते फक्त जाणता राजा नाही तर मराठी माणसासाठी दैवत आहे. त्यांचे उभे आयुष्य मोठा विषय आहे. ते केवळ एक शासक नव्हते, तर ते उत्तम मॅनेजमेंट गुरु देखील होते. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. त्यांचे नेतृत्व गुण, दळणवळणाचे व्यवस्थापन, लढाया, तह, स्वराज्य विस्तार करतानाचे नियोजन, रसद पुरविण्याचे तंत्रज्ञान, स्वराज्य स्थापन करताना नियुक्त केलेले मंत्रिमंडळ, सैन्यदलाची उभारणी ह्या अनेक पैलुतून त्यांचे व्यवस्थापन कौशल्य बघायला मिळते आणि त्यातून खूप काही शिकायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची परिस्थिति यांची सांगड घालताना मी काय करू शकतो याचा आपली विचार करावा आणि आपली सदसदविवेकबुद्धीचा वापर करून समाजात वावरवे.’

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि मान्यवर.

एनएसएस विभागप्रमुख प्रा. सुशील साळवी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. या वेळी उपस्थितांना छत्रपतींच्या जीवनावर चित्रित केलेल्या चित्रपट दाखविण्यात आला. या वेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button