आर्टिकल

राज्ययंत्रणा आणि लोक यांच्यातील विश्वासाचा मुद्दा!!

इतिहासात प्रत्येक पिढीचे मूल्यमापन तिच्या निव्वळ सवयींवर नव्हे, तर ती संकटाच्या काळात कोणती भूमिका घेते यावर होते. ‘जेन झी’ ही फक्त डिजिटल जगात जगते, प्रत्यक्ष सामाजिक प्रश्नांशी तिचा संबंध नाही, असा समज समाजाच्या एका मोठ्या वर्गाने करून घेतला होता.

आजची तरुण पिढी म्हणजे मोबाइलमध्ये हरवलेली पिढी’, ‘रील्स आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पिढी’, ‘तिला समाज, लोकशाही किंवा संविधानाशी काही देणेघेणे नाही’ अशी टीका सातत्याने केली जात होती. परंतु भारतात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांनी हा समज मोठ्या प्रमाणात बदलला. जी पिढी कालपर्यंत सोशल मीडियावर मनोरंजन शोधत होती, तीच आज न्याय, पारदर्शकता, समान संधी आणि उत्तरदायी शासन या प्रश्नांवर देशव्यापी चर्चा घडवून आणत असल्याचे दिसले.

प्रत्येक काळ आपल्या आंदोलनाची भाषा स्वत: निर्माण करतो. स्वातंत्र्यलढ्याने सत्याग्रह दिला, विद्यार्थी चळवळींनी रस्त्यावरचे आंदोलन दिले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगाने डिजिटल संवाद दिला, आणि ‘जेन झी’ ने या सर्वांचा संगम घडवून आणला. तिच्यासाठी मोबाइल हा केवळ संवादाचे साधन नाही, तर लोकशाहीतील नागरिक सहभागाचे नवे व्यासपीठ आहे. समाजमाध्यमे आणि डिजिटल समुदाय हे आजच्या युवकांसाठी आधुनिक सार्वजनिक चौक झाले आहेत. येथे विचार मांडले जातात, पुरावे शेअर होतात, प्रश्न विचारले जातात आणि काही तासांतच लाखो लोक एका मुद्द्यावर एकत्र येतात. डिजिटल माध्यमे ही आता लोकशाहीतील नव्या सार्वजनिक क्षेत्राचे रूप धारण करत आहेत. याच वातावरणात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही उपरोधिक संकल्पना चर्चेत आली. काही दिवसांतच समाजमाध्यमांतून लाखो युवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने राजकीय संवादाची शैलीच बदलून टाकली. पूर्वी आंदोलने सभांमधून सुरू होत, आता ती एका रीलपासून सुरू होतात. पूर्वी वृत्तपत्रे आणि चित्रवाणी वाहिन्या आंदोलनाची दिशा ठरवत, आता सामान्य विद्यार्थी स्वत:चा मोबाइल हातात घेऊन संपूर्ण देशाला थेट संवाद साधतो. त्यामुळे ‘जेन झी’ने आंदोलनाचे केंद्रीकरण मोडून लोकशाहीचे विकेंद्रीकरण केले आहे. प्रत्येक मोबाइल हा आता संभाव्य जनमाध्यम झाला आहे आणि प्रत्येक नागरिक हा संभाव्य संवादकर्ता झाला आहे. हा बदल केवळ तांत्रिक नाही; तो भारतीय लोकशाहीच्या सामाजिक रचनेत घडत असलेला महत्त्वपूर्ण बदल आहे. तथापि, या डिजिटल क्रांतीकडे केवळ उत्साहाने पाहणेही योग्य ठरणार नाही. समाजमाध्यमे दिशाभूल करणार्‍या माहितीचीही वाहक ठरू शकतात. अल्गोरिदमवर आधारित मतनिर्मिती, अर्धसत्यांचा प्रसार, ट्रोल संस्कृती आणि भावनिक ध्रुवीकरण ही या नव्या सार्वजनिक क्षेत्राची गंभीर आव्हाने आहेत. त्यामुळे डिजिटल आंदोलनाची नैतिकता ही तथ्य, पुरावे आणि घटनात्मक मूल्यांवर उभी राहिली, तरच त्याचे लोकशाही महत्त्व टिकून राहील. कार्यक्षमतेपुरते नव्हे…

समाजमाध्यमांवर विद्यार्थ्यांनी स्वत:चे अनुभव मांडण्यास सुरुवात केली. अशा हजारो व्हिडिओ, लाखो प्रतिक्रिया आणि असंख्य चर्चांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली-ही समस्या एका राज्याची किंवा एका परीक्षेची नाही; ती संपूर्ण व्यवस्था अधिक उत्तरदायी करण्याची मागणी आहे. या आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की तरुणांना व्यवस्था पाडायची नाही, व्यवस्था सुधारायची आहे. त्यांना संघर्ष हवा आहे, पण तो संविधानाच्या चौकटीत, त्यांना आंदोलन करायचे आहे, पण ते शांततापूर्ण मार्गाने, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, पण त्याचबरोबर उत्तरदायी संस्थाही हव्यात. म्हणूनच जंतरमंतरवरील हा आवाज केवळ एका पिढीचा आवाज नाही; तो भारतीय लोकशाहीसमोरील आरसा आहे. या आरशात शासन, संस्था आणि समाज या तिन्ही घटकांनी स्वत:कडे पाहण्याची गरज आहे. लोकशाहीचे खरे सामर्थ्य सत्तेच्या कार्यक्षमतेपुरते मर्यादित नसते; ते असहमतीचा आवाज ऐकण्याच्या क्षमतेत असते. निवडणुका लोकशाहीला वैधता देतात, परंतु आंदोलने लोकशाहीला संवेदनशील बनवतात. म्हणूनच जंतरमंतरवर सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने भारतीय लोकशाहीसमोर केवळ रोजगार, परीक्षा किंवा पेपर लीकचा प्रश्न उभा केला नाही, तर राज्य आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा प्रश्न केंद्रस्थानी आणला. गेल्या महिन्याभरापासून विविध राज्यांतील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आणि युवक जंतरमंतरवर शांततापूर्ण पद्धतीने आपला आवाज मांडत होते. परंतु आंदोलनाचा विस्तार होत गेला तसे त्याभोवती तणावही वाढू लागला. सार्वजनिकरीत्या उघड झालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठ्या आणि अश्रूधुराचा मारा केला. या घटनांनी एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला. लोकशाहीत प्रश्न विचारणार्‍या तरुणांशी संवाद साधायचा की त्यांना केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पाहायचे?

भारतीय राज्यघटना

नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण सभा घेण्याचा अधिकार आणि शासनाला प्रश्न विचारण्याचा घटनात्मक मार्ग उपलब्ध करून देते. अर्थात हे अधिकार अमर्याद नसून सार्वजनिक सुव्यवस्था आणि कायद्याच्या चौकटीतच वापरले जातात. लोकशाहीत दोन जबाबदार्‍या एकाच वेळी पार पाडाव्या लागतात- सार्वजनिक सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांच्या वैध लोकशाही हक्कांचे संरक्षण करणे. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही समतोलाची कसोटी अधिक तीव्र झाली. जेव्हा तरुणांच्या हातात दगड नसून फलक असतात, घोषणांमध्ये हिंसा नसून न्यायाची मागणी असते, तेव्हा त्यांच्या आवाजाला केवळ प्रशासकीय समस्येच्या चौकटीत पाहणे अपुरे ठरते. विद्यार्थी प्रश्न विचारतात, याचा अर्थ ते व्यवस्थेविरोधी आहेत असे नाही; उलट ते व्यवस्था अधिक सक्षम व्हावी अशी अपेक्षा बाळगतात.

या आंदोलनाने उपस्थित केलेले प्रश्न दीर्घकाळ भारतीय सार्वजनिक जीवनात घुमत राहतील. कारण कोणत्याही राष्ट्राचे भविष्य केवळ त्याचे रस्ते आणि पूल किती आधुनिक आहेत यावर नव्हे, तर त्याच्या तरुणांचा न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर किती विश्वास आहे, यावरच ठरणार असते. हा विश्वास टिकवणे ही राज्याची, समाजाची आणि नागरिकांची समान जबाबदारी आहे. आणि म्हणूनच ‘जेन झी’ चे हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून, भारतीय लोकशाहीच्या प्रगल्भतेची एक ऐतिहासिक कसोटी आहे.

राजीनामा घेण्यात आला किंवा प्रक्रियेत सुधारणा करण्याचे आश्वासन मिळाले, हा या आंदोलनाचा तात्कालिक परिणाम असू शकतो. परंतु लोकशाहीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की त्या आंदोलनाने नागरिकांना अधिक जागरूक, शासनाला अधिक उत्तरदायी आणि संस्थांना अधिक पारदर्शक बनवले का? सध्या तरी तरुणांच्या आवाजाला राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचा विजय या आंदोलनाने मिळवला, हे महत्त्वाचे आहे. तरुणांच्या आंदोलनाने धोरणात्मक पातळीवर गंभीर चर्चा सुरू करण्यास सरकारला भाग पाडले आहे.

म्हणूनच ‘जेन झी’च्या आंदोलनाकडे केवळ वर्तमानातील राजकीय घटना म्हणून पाहणे अपुरे ठरेल. तो भारताच्या लोकशाही संस्कृतीत होत असलेल्या एका खोल परिवर्तनाचा संकेत असू शकतो. इतिहास साक्षी आहे की प्रत्येक युगाने आपल्या परिवर्तनाची सुरुवात तरुणांच्या प्रश्नांपासून केली आहे. स्वातंत्र्यलढा असो, सामाजिक सुधारणा असोत किंवा लोकशाही हक्कांसाठीच्या चळवळी प्रत्येक काळात युवकांनी समाजाला नव्या दिशेने विचार करायला भाग पाडले आहे. आज ‘जेन झी’च्या हातात डिजिटल साधने आहेत, परंतु तिच्या मनात न्याय, समता आणि उत्तरदायित्वाची आकांक्षा आहे. तिची भाषा आधुनिक आहे; पण तिच्या प्रश्नांचे केंद्र भारतीय राज्यघटनेतील मूल्येच आहेत. त्यामुळे या चळवळीचा सर्वात मोठा संदेश असा आहे की डिजिटल युगातील नागरिकत्व हे केवळ ऑनलाइन उपस्थिती नाही; तर लोकशाहीतील सक्रिय, जबाबदार आणि घटनात्मक सहभाग आहे. ‘जेन झी’ ही भारतीय लोकशाहीच्या नव्या नागरिक संस्कृतीची पिढी आहे. तिचे मौन तुटले आहे, परंतु तिचा आवाज केवळ असंतोषाचा नाही, तो न्याय, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि संविधाननिष्ठ लोकशाहीचा आवाज आहे.

  आज प्रश्न इतकाच नाही की ‘जेन झी’ जिंकली का? खरा प्रश्न असा आहे की भारतीय लोकशाहीने आपल्या तरुणांचा आवाज ऐकला का? कारण ज्या राष्ट्रात प्रश्न विचारणारे विद्यार्थी जिवंत असतात, तेथे लोकशाहीही जिवंत राहते. म्हणूनच या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय कोणत्याही एका निर्णयात नसून, भारतीय युवकांनी लोकशाहीवरचा आपला विश्वास पुन्हा एकदा सार्वजनिकपणे व्यक्त केला, यात आहे. इतिहासाच्या पानांवर हा क्षण कदाचित एका आंदोलनाचा शेवट म्हणून नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या नव्या अध्यायाची सुरुवात म्हणून नोंदवला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button