एस. पी. हेगशेटये महाविद्यालय व नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयात पाककृतींनी रंगला “रानभाज्यांच्या पाककला” महोत्सव.

रत्नागिरी : निसर्गाच्या कुशीतून मिळणाऱ्या रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीतील महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने एस. पी. हेगशेटये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रत्नागिरी आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ जुलै २०२६ रोजी रानभाज्या पाककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांपासून तयार केलेल्या आकर्षक व रुचकर पाककृतींनी महोत्सवात चांगलीच रंगत आणली.
या महोत्सवानिमित्त कुर्डू, फोडशी, टाकळा, भारंगी, कार्टुली/करटोली, अळू (तेरी), शेवरा/कुड्याच्या शेंगा, अळंबी, घोळ, बांबूचे कोंब, आघाडा, तांदुळजा, केना आणि मायाळू अशा विविध रानभाज्यांची माहिती देणारे भित्तिपत्रक सादर करण्यात आले. या भित्तिपत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर रानभाज्या पाककला महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय गवाळे, प्रा. सुकुमार शिंदे,प्रा. सुशील साळवी प्रा.ताराचंद ढोबाळे तसेच कला विभागप्रमुख प्रा. वर्षा कुबल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी स्पर्धेचे परीक्षण प्रा. मेघना शेलार, प्रा. मेघा पोरे यांनी केले. प्रा. निकिता नलावडे, प्रा. श्रेया राऊत,प्रा सचिन टेकाळे,प्रा. प्रियांका लाड प्रा. अश्विनी कांबळे, प्रा.हर्षदा शिऊडकर, प्रा. राजेश कांबळे, प्रा. तेजस्विनी पवार तसेच वाणिज्य विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.
एस. पी. हेगशेटये महाविद्यालयातील १४ स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत राहिला मुकादम हिने प्रथम क्रमांक पटकावला. सानिया कुडतडकर हिने द्वितीय, हर्षदा भोळे हिने तृतीय, तर सलोनी सागवेकर हिने चौथा क्रमांक मिळविला. इन्शा धामसकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाच्या १४ स्पर्धकांनी सहभाग घेतला असून ओंकार गांगण याने प्रथम क्रमांक मिळविला. अर्थव गायकवाड याने द्वितीय, अदिती शिंदे हिने तृतीय, तर सना निंबाळ हिने चौथा क्रमांक पटकावला. सोमय्या भारदे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागप्रमुख, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे हा पाककला महोत्सव उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.
रानभाज्यांच्या विविध पाककृतींच्या माध्यमातून निसर्ग, आरोग्य आणि पारंपरिकखाद्यसंस्कृतीचा सुंदर संगम या महोत्सवातून अनुभवायला मिळाला.



