वंचितच्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला
प्रचाराच्या धामधुमीत जिल्ह्यात खळबळ : जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घटनेच्या चौकशीचे आदेश

गुहागर : वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर आज (१७ नोव्हेंबर) दुपारी तालुक्यातील नरवण येथील सावली हॉटेलबाहेर प्राणघातक हल्ला झाला. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच प्रचाराच्या धामधुमीत ही घटना घडल्याने गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
विकास जाधव हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. सर्वच पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत रंगले असतानाच आज दुपारी घडलेल्या या घटनेने चर्चेला एकच उधाण आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेतली असून हा हल्ला कोणी केला, नेमका कोणत्या प्रकरणातून झाला याचा शोध गुहागर पोलीस घेत आहेत. जिल्ह्यात सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश गुहागर पोलिसांना दिले आहेत.



