यूथ गेम्समध्ये खेळाडूंच्या ज्ञानात भर
या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण अस्सल भारतीय ‘खो-खो,’ या खेळाचा गौरवशाली प्रवास !

संगमेश्वर :- यूथ गेम्स म्हणजे केवळ मैदानी स्पर्धा आणि पदकांची लयलूट नव्हे, तर खेळाच्या ‘मुळा आणि कुळा’ची ओळख करून देणारे एक व्यासपीठ ठरते आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही यूथ गेम्समध्ये भरवण्यात आलेल्या विशेष माहितीपूर्ण प्रदर्शनाने खेळाडू आणि क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. यंदा या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरला तो प्रदर्शनाचे माध्यमातून मांडण्यात आलेला अस्सल भारतीय खेळ ‘खो-खो,’ या खेळाचा गौरवशाली प्रवास !
या प्रदर्शनात केवळ नियमावली नाही, तर खो-खो खेळाचा उगम कसा झाला, त्यातील कौशल्ये आणि या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेले दिग्गज खेळाडू यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. खेळाडूंचा इतिहास, जुनी छायाचित्रे आणि आतापर्यंतचे विक्रम पाहून अनेक उदयोन्मुख खेळाडू भारावून गेले आहेत. यूथ गेम्सच्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ माहिती फलक न लावता, चित्रफितींच्या माध्यमातून खेळाडूंचे प्रबोधन केले जाते. यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि स्विमिंग या खेळांची रंजक माहिती यशस्वीपणे मांडण्यात आली होती. या खेळांच्या चित्रफितींमुळे खेळाडूंना त्या-त्या खेळातील तंत्र आणि जागतिक दर्जाचे बारकावे समजून घेण्यास मोठी मदत होत आहे.
या प्रदर्शनात अभ्यासपूर्ण मांडणी, केवळ स्पर्धा न घेता खेळाडूंना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी हे प्रदर्शन दरवर्षी भरवले जाते. यामुळे खेळाडूंना आपल्या आवडत्या खेळाची पाळेमुळे नेमकी कुठे आहेत, हे जाणून घेण्याची संधी मिळते. ‘अभ्यासपूर्ण प्रदर्शन’ ही आता यूथ गेम्सची एक नवी ओळख बनली असून, यंदाही खेळाडूंच्या गर्दीने हे सिद्ध केले आहे.
“मैदानावर खेळताना आम्हाला फक्त सराव ठाऊक असतो, पण अशा प्रदर्शनांमुळे खेळाचा इतिहास समजतो. खो-खो सारख्या खेळाचे बारकावे पाहून खरोखरच येथे सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंना प्रेरणा मिळाली,” अशी प्रतिक्रिया येथे आलेले खो – खो खेळाचे मागदर्शक विनोद मयेकर यांनी दिली.



