मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकासाठी आ.शेखर निकम यांची ३०० कोटींची मागणी

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य आणि दिव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन ३०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी विशेष निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली.

आमदार निकम यांनी निवेदनात नमूद केले की, कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास केवळ संगमेश्वरपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचा विषय आहे. महाराजांचा त्याग आणि लढा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरावा, यासाठी या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व जतन करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी यांनी या स्मारकासाठी ३१३ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा आधीच तयार करून शासनाला सादर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे.सध्याची ५ एकर जागा आणि नियोजित १०० एकर परिसराचे संपादन करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणे.

शास्त्रीपुल ते शृंगारपूर या ऐतिहासिक मार्गाचा सर्वांगीण विकास करणे. (शृंगारपूर हे महाराजांचे सासर असून येथे मालोजीराजे घोरपडे यांची समाधी आहे).कसबा परिसरातील सुमारे ३०० पुरातन मंदिरांचा एकात्मिक विकास आराखडा राबवून सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करणे.स्मारकाजवळ शास्त्री नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यासाठी ६६ कोटी २२ लाखांचे अंदाजपत्रक तयार आहे.

यापूर्वी २७ एप्रिल २०२५ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. येथे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे ही दादांची मनापासून इच्छा होती, याची आठवणही निकम यांनी करून दिली.

आगामी अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये या दोन्ही आराखड्यांना मंजुरी देऊन पहिल्या टप्प्यातील निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून स्मारकाच्या कामाला गती मिळेल, अशी आग्रही मागणी आमदार निकम यांनी केली आहे.

या कार्यक्रमावेळी आमदार संग्रामभैया जगताप,आमदार सुनील शेळके, आमदार संजय खोडके, माजी आमदार राजेश पाटील, देवेंद्र भुयार आणि प्रकाश आजबे आदि मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button