भारतीय औषधांसाठी चीनने दरवाजे उघडले; ३०% आयात शुल्क शून्यावर

चीनने भारतीय औषध क्षेत्रासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत भारतीय औषधांवर लावलेले तब्बल ३० टक्के आयात शुल्क चीनने पूर्णपणे रद्द केले असून, आता भारतीय कंपन्यांना शून्य शुल्कात औषधे चीनमध्ये निर्यात करता येणार आहेत.
हा निर्णय अमेरिकेच्या अलीकडील कठोर धोरणांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचा ठरत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही औषधांवर तब्बल १०० टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारताच्या औषध निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशात चीनकडून उचललेले पाऊल भारतीय औषध उद्योगासाठी ‘गुड न्यूज’ ठरले आहे.
शून्य आयात शुल्कामुळे भारतीय औषध उत्पादक आणि निर्यातदार कंपन्यांना चीनमध्ये सहज प्रवेश मिळेल. तज्ज्ञांच्या मते, यामुळे पुढील काही वर्षांत भारतीय औषध निर्यातीत अब्जावधी डॉलर्सची वाढ होऊ शकते. चीनकडे प्रचंड लोकसंख्या असल्याने औषधांची मागणीही प्रचंड आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांसाठी ही बाजारपेठ सुवर्णसंधी ठरू शकते.
भारताला ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ अशी ओळख आहे. जगभरात भारतातून जेनेरिक औषधे आणि लसींचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होतो. मात्र, चीनमधील उच्च आयात शुल्कामुळे तेथील बाजारपेठ भारतीय कंपन्यांसाठी आव्हानात्मक ठरत होती. आता परिस्थितीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे.
भारतीय औषधांची निर्यात चीनमध्ये वाढल्यास अनेक सकारात्मक परिणाम घडू शकतात. सध्या भारत-चीन व्यापार चीनच्या फायद्यात मोठ्या प्रमाणात झुकलेला आहे. भारतीय औषध निर्यातीमुळे हा व्यापार काही प्रमाणात समतोल होण्यास मदत होईल. तसेच भारतात रोजगार निर्मिती, महसुलात वाढ आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान अधिक बळकट होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.



