सामाजिक कार्यकर्ते उदय संसारे यांचा पर्यावरणपूरक संकल्प : झाडे लावा, झाडे जगवा!

संगमेश्वर : पर्यावरणाचे संतुलन राखणे हे काळाची गरज बनले असताना, संगमेश्वर बाजारपेठेतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उदय संसारे यांनी स्वतः पुढाकार घेत समाजात पर्यावरण जागृतीचे बीज पेरले आहे. केवळ झाडे वाटप करून थांबत नाहीत, तर ती झाडे जगवण्यासाठी आवश्यक मदत व प्रबोधन करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.
आपल्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक अभिनव संकल्प करत दोन टप्प्यांत झाडांचे वाटप केले. या उपक्रमांतर्गत स्थानिक समाज मंदिरे, ग्रामदेवता मंदिरे, हायस्कूल, महाविद्यालये तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या परिसरात लागणारी झाडे विनामूल्य पुरवण्यात आली. केवळ झाडे देऊन थांबणे नव्हे, तर ती झाडे का लावायची, त्याचे पर्यावरणीय महत्त्व काय आहे – याचे प्रबोधनही त्यांनी केले.
नुकतीच उदय संसारे यांनी नवनिर्माण महाविद्यालय, संगमेश्वर येथे भेट देऊन वृक्षारोपण केले. महाविद्यालयाच्या परिसरासाठी फुलझाडांची गरज ओळखून, त्यांनी स्वतः पुढाकार घेत फुलझाडे महाविद्यालय प्रशासनाला सुपूर्द केली. यावेळी सायन्स विभागासाठी बॉटनिकल गार्डन तयार करण्यासाठी लागणारी झाडे त्यांनी दिली असून, आज महाविद्यालयात एक सुसज्ज बॉटनिकल गार्डन उभे राहिले आहे.
या प्रसंगी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बापू भिंगार्डे, उदय मुळ्ये, भिकाजी साळवी, संदेश कापडी, विजय पवार, गणपती नाझरे, प्रमोद शेट्ये, अध्यक्ष विनायक पाथरे, विनोद मुळ्ये, दिलीप प्रभावळकर, रामभाऊ दोरकडे, विलास चव्हाण, अविनाश चोचे, मुजबर मुल्ला, तसेच प्राचार्य डॉ. संजना चव्हाण व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
उदय संसारे यांचा ‘झाडे लावा – झाडे जगवा’ हा संदेश समाजाला केवळ प्रेरणा देणारा नव्हे, तर कृतीशीलतेचे उदाहरण ठरतो आहे. अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान आणि त्यांचे कार्य समाजात अधिकाधिक पोहचवले जाणे हे अत्यंत आवश्यक आहे.



