मुख्य बातमीराजकीय

एक पाऊल पुढे या, राज ठाकरे १०० पावलं पुढे येतील”, ठाकरे गटाबरोबरच्या युतीसाठी मनसेने जाहीर केली भूमिका !

मुंबई : राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळं बस्तान मांडलेल्या ठाकरे बंधूंनी आता एकत्र यावं आणि पालिका निवडणुकीवर ठाकरेंचा झेंडा फडकावा अशी मागणी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.

राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या एका वक्तव्यावरून या चर्चांना सुरुवात झाली. मात्र, या चर्चेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, या चर्चा थांबाव्यात आणि मनसेची नेमकी भूमिका काय हे सांगण्याकरता मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

“शिवसेना-मनसे संदर्भातील निर्णय राज ठाकरे घेत असतात. यासंदर्भात कोणतीही चर्चा पक्षांतर्गत झाली नाही. आमचं तोंड दुधाने पोळलं गेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो. जोपर्यंत कोणताही ठोस प्रस्ताव राज ठाकरेंपर्यंत पोहोचत नाही, तोवर आम्ही निर्णय घेणार नाही. ज्यावेळेला येईल, त्यावेळी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील”, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही

“२०१४ आणि २०१७ मधील घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत. ज्यावेळी आपण युती करावी अशी आमची भावना होती, तेव्हा म्हणजेच २०१४ रोजी बाळा नांदगावकर राज ठाकरेंच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. पण सुभाष देसाईंना ते भेटले, तेव्हा राज ठाकरेंना युती करायची आहे, असं त्यांना कळवलं होतं. याला म्हणतात प्रस्ताव. असा कोणताही प्रस्ताव आता आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे त्यावर राज ठाकरेंनी कसा निर्णय घ्यायचा आहे?” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला.

तर उद्धव ठाकरेंकडून एक कॉल यावा

“दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे, अख्खी शिवसेना म्हणत असेल की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबर जायला हवं, तर उद्धव ठाकरेंकडून एक कॉल यावा अशी अपेक्षा आहे. कॅमेऱ्यासमोर बोलणाऱ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलावं. एक पाऊल पुढे या, राज ठाकरे १०० पावलं पुढे येतील”, असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे. जोपर्यंत त्यांच्याकडून काहीही ठोस येत नाही, तोवर आम्ही पुढे कसं जाणार? असा प्रश्नही अविनाश जाधव यांनी विचारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button