महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

भविष्यातील महासाथी रोखणार ‘नक्षत्र’! केंद्र, सरकारकडून देशातील पहिला प्रकल्प पुण्यात सुरू!सरकारकडून देशातील पहिला प्रकल्प पुण्यात सुरू!

पुणे : गुंतागुंतीच्या जनुकीय विदेचे जलद विश्लेषण आणि भविष्यातील महासाथींना रोखण्याच्या सज्जतेसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) ‘नक्षत्र’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही देशातील पहिली उच्च कार्यक्षमता संगणन सुविधा असून, या माध्यमातून अत्याधुनिक सार्वजनिक आरोग्य संशोधनाच्या क्षेत्रात मोठा टप्पा गाठण्यात आला आहे.

‘नक्षत्र’चे उद्घाटन केंद्रीय आरोग्य संशोधन सचिव व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. राजीव बहल यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘एनआयव्ही’चे संचालक डॉ. नवीन कुमार उपस्थित होते. पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मोहिमेंतर्गत उच्च कार्यक्षमता संगणनावर आधारित प्रगत जनुकीय क्रमनिर्धारण केंद्र उभारण्यात येणार आहे. ‘नक्षत्र’ हा त्याचाच भाग आहे. या माध्यमातून जनुकीय आणि जैवमाहिती विदा प्रक्रियेत अमूलाग्र बदल होणार आहे. करोना संकटावेळी पांरपरिक संगणनाच्या पायाभूत सुविधांमुळे सरकारला अनेक मर्यादा आल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

‘विकसित भारताच्या दिशेने योग्य वेळी टाकलेले हे पाऊल आहे. ‘नक्षत्र’मुळे देशातील जनुकीय सर्वेक्षण आणि विदा विश्लेषण क्षमतेत फार मोठी वाढ होणार आहे. भविष्यातील आरोग्य संकटे आणि महासाथींचा सामना करण्यासाठीच्या सज्जतेत यामुळे भर पडेल,’ असे डॉ. राजीव बहल यांनी सांगितले. ‘महासाथींना रोखण्यासाठी नवीन उच्च कार्यक्षमता संगणन सुविधा महत्वाची भूमिका बजावेल,’ असे डॉ. नवीन कुमार यांनी स्पष्ट केले.

‘नक्षत्र’ सुविधेमध्ये १२ कम्प्युट नोड्स असून, त्यातून एकूण ७०० गाभा क्षमता आणि १ पेटाबाइट साठवण क्षमता उपलब्ध होणार आहे. या पायाभूत सुविधेमुळे गुंतागुंतीच्या जैवमाहितीवर प्रक्रिया करून प्रगत जनुकीय क्रमनिर्धारण करता येणार आहे. तसेच, जनुकशास्त्राच्या ट्रान्सक्रिप्टोनॉमिक्स, फायलोजेनेटिक्स, मेटाजिनोमिक्स या शाखांच्या विदेचे विश्लेषणही करता येईल. भविष्यात या सुविधेमुळे विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांना मोठे पाठबळ मिळणार, ‘नक्षत्र’मुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सार्वजनिक आरोग्यासाठी शक्य.

आरोग्य साथींचा सामना करण्याचा वेग, अचूकता आणि सज्जता यात सुधारणा

गुंतागुंतीच्या जनुकीय विदेचे अतिशय जलद सर्वेक्षण

नवीन रोगांच्या धोक्याचा लवकर शोध अधिक प्रभावी पद्धतीने महासाथी रोखण्याची कार्यवाही

कृत्रिम प्रज्ञा (एआय) आधारित लस व औषध विकासाला गती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button