दररोज दिसे रस्त्यावरी सुखरूप पोहोचवते घरोघरी…ती माझी एसटी !

आज लालपरीचा वाढदिवस !
महाराष्ट्र राज्य अखंड भारतातील एक विकसनशील प्रगतशील राज्य कला साहित्य, संस्कृती याची जोपासना करून सातत्याने अग्रेसर रहाणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य.. आपल्या नावाप्रमाणेच त्याचा भौगोलिक विस्तार खुप मोठा आहे.या महाकाय राज्याचा विकास साधताना राज्यातील दळणवळण व वाहतुकीची साधने यांचा विचार करता क्षणभर का होईना चक्रावल्या होते.
मग विचार मनात येतो की, वाहतुकीचा असा जटील प्रश्न किंबहुना जिल्ह्या जिल्ह्यातून, शहरातून खेडयातुन सातत्याने फिरत असणारे हे वाहतुकीचे महाकाय चक्र सक्षमपणे कोण बरे चालवत असेल ? या प्रश्नाचे एक आणि एकच उत्तर,ते म्हणजे राज्य परिवहन महामंडळ म्हणजे च आपली लाल परी एसटी होय!!
१ जून १९४८ साली पहीली बस पूणे ते अहमदनगर या रस्त्यावर धावली.आंब्याच्या झाडाखाली या ए सटीची .नोंद झाली.. ग्रामीण भाग, शहरी भागाचा समन्वय साधण्याचे महत्वाचे कार्य हे एसटी महामंडळाचेच! संपुर्ण महाराष्ट्राच्या शहराचे जाळे म्हणजे एसटीची अविक्रांत सेवा.! ही राज्य परिवहन महामंडळाची सेवा ही आशिया खंडातील एक अव्वल दर्जाची सेवा मानली जाते.
मंडळाचे कार्यक्षेत्र,सेवेचा दर्जा फेऱ्यांची नियमितता बस थांबे,आगार, कार्यशाळा सुरक्षितता आणि अल्प मोबदल्यात प्रवासी सेवा.. प्रवासी सेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी ठेवून विद्यार्थी पत्रकार स्वातंत्र्य सैनिक जेष्ठ नागरिक, महीला, ७५ वर्षांवरील जेष्ठ,अ़ध, अपंग, यांना राखीव आसने , प्रवासात सवलत अशा अनेक योजना राबवित असते.हे सर्व करत असताना गाव तेथे एसटी हे ब्रीद जोपासते.मग तेथे व्यापारी विचार मनात ठेवून केवळ नफ्या पोटी ठराविक मार्ग चालविणे हे ध्येय नसून सामाजिक वसा जपण्यासाठी नुकसानिचे मार्ग चालविण्याचे धाडस इतर कोणीही करू शकणार नाही.
मुंबई सारख्या शहरातील एसटी शी जरी फारसा संबंध नसला तरी वर्षातून एकदा का होईना आठवण होते ती एसटीची ! लाल साडी पिवळा ब्लाऊज,असा ठसठशीत साज करून एखादी लक्ष्मी बाहेर पडावी तशी एसटी ची गाडी चौपन्न ( आता चाळीस) पिल्लांना पोटात सामावून रस्त्यांवरुन धाऊ लागली की मन कसं भरून येते.
एसटी मुळे विद्यार्थी शिकले, नोकरदार, गोरगरीबांच्या मुलांना शाळेत येण्यासाठी एसटीची च सेवा! सणांचे महत्व लक्षात घेता गणपती, होळी, दिवाळी तसेच पंढरपूर यात्रा, लग्नसमारंभ, गावोगावच्या लहान यात्रा,अशा वेळी प्रामुख्याने भाविकांची सोय एसटीच करत असते.गोरगरीब मध्यमवर्गीय उच्चवर्गीय असा भेदभाव न करता अल्प मोबदल्यात प्रवासी सेवा पुरवणारी ही एसटीच!! प्रवासी सेवे बरोबर माल वाहतुकीतही मागे नाही.
अशा या महामंडळाच्या प्रदीर्घ सेवेला आज ७७ वर्ष पुर्ण झाली या महामंडळात कार्यरत असणारे चालक,वाहक, स्वछक, सफाई कामगार , कर्मचाऱी , व्यवस्थापक, नियंत्रक, यांच्या सहकार्याच्या बळावरच आज पर्यंतची यशस्वी वाटचाल करता आली.या पुढेही अशी च कार्यक्षमपणे अविरत चालू राहो.
या करीता राज्य सरकारने या लाल परीला आशिर्वाद देते आवश्यक आहे.आज संपुर्ण राजकारणाचा केंद्र बिंदू ही एसटीची आहे. कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देऊन ही महामंडळाची एसटी अशीच दौडत रहाण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहकार्य करावे .असे या वर्धापन दिनानिमित्त विनंती करतो.
महाराष्ट्राच्या गौरव शाली परंपरेच्या शिरपेचात खोचलेले एसटी महामंडळ रुपी सुवर्ण पिस मराठी माणसाला नक्कीच अभिमानास्पद आहे यात शंका नाही..
विजयराव शिंदे
प्रादेशिक सचिव, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना


