सण-उत्सवांमध्ये शांतता राखण्यासाठी रत्नागिरीत ‘सामाजिक सलोखा समिती’ स्थापन करणार – जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

रत्नागिरी – जिल्ह्यात सामाजिक सलोखा आणि शांतता टिकवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षकांनी याविषयीचे मार्गादर्शन सर्व पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना केले असून या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व धार्मिक सण आणि उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही समिती समाजात सलोखा आणि एकोपा वाढवण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सर्वसमावेशक रचना : या समितीमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती, सर्व जाती-धर्मांचे धर्मगुरु आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समावेश असेल. यामुळे समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे शक्य होणार आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेची दक्षता : या समितीमार्फत धार्मिक सण आणि उत्सवाच्या वेळी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घेतली जाईल.
उच्चस्तरीय मार्गदर्शन : या सामाजिक सलोखा समितीचे कामकाज पोलीस अधीक्षक, रत्नागिरी नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. काही महत्त्वाच्या बैठकांना ते स्वतः आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड या उपस्थित रहातील.



