मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – नारायण राणे

रत्नागिरी– मुंबई-गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांनी आता याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे, चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही अशा कडक शब्दांत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

राणे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, नगरपालिका प्रशासन प्रमुख वैभव गारवे, कोकण रेल्वेचे शैलेश बापट, जलसंपदा विभागाचे गणेश सलगर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मानसिंग पाटील, महिला बालकल्याण विभागाचे श्रीकांत हावळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

पहिल्या पावसातच लांजा येथील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा बोजवारा उडाला. नागरिक आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी बैठकीत श्री. राणे यांनी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. वेळात आणि योग्य काम करत नसेल तर त्याचा ठेका रद्द करा, काम योग्य होण्यासाठी अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठेकेदार काय काम करतोय, किती माणसे आहेत, योग्य पद्धतीने काम होते की नाही याची खात्री करावी आणि त्याचा अहवाल द्यावा, पावसाळा येत्या ७ जूनपासून सुरू होतो आहे, तोपर्यंत उर्वरित कामे पूर्ण झाली पाहिजेत, यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या ग्रामीण रस्त्यांची काय स्थिती आहे, त्यातील किती खराब आहेत याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला केल्या.

या बैठकीत सर्व विभागांचा विस्तृत आढावा घेत श्री. राणे यांनी संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांना नैसर्गिक आपत्ती काळात आपापल्या विभागांबाबत सतर्क राहून आपत्ती ओढवणार नाही आणि ओढावलीच तर त्यातून तात्काळ उपाययोजना कशी करता येईल याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना दिल्या. नैसर्गिक आपत्ती काळात प्रशासनाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे. तसेच मान्सूनपूर्व सर्व कामे पूर्ण करावी, शाळा सुरू होण्यापूर्वी त्या सर्व शाळांची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याबाबत आदेश देतानाच शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करून योग्य ती खबरदारी घ्यावी, या पावसाळ्यात छप्पर गळतीमुळे शाळा बंद अशी माहिती किंवा बातमी येत कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाने साथींचे आजार लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा योग्य पुरवठा करताना डॉक्टरांच्या नियुक्त्या करून साथीचे आजार पसरणार नाहीत, याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या. कोकण रेल्वेने केलेल्या आपत्ती काळातील उपाययोजनांची माहिती घेताना त्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे नवीन थांबे, नवे स्थानक याबाबत काय प्रस्ताव आहेत ते आपल्याला सादर करावेत, अशा सूचना दिल्या. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात किती नुकसान झाले, जीवित हानी किती झाली, शासकीय मदत किती जनांपर्यंत पोहोचली, ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाही त्यांना ती लवकरात लवकर पोहोचवा, असे निर्देश श्री. राणे यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button