नेत्रावती एक्सप्रेस थांब्याचा ‘नेत्र’दीपक सोहळा २२ ऑगस्टला

संगमेश्वर : निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या पुढाकाराने आणि सातत्याच्या पाठपुराव्याने संगमेश्वरवासीय जनतेच्या नेत्रावती एक्सप्रेसच्या संगमेश्वर थांब्याच्या मागणीला कोकण रेल्वेने हिरवा कंदील दाखवला आणि दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी पहिल्यांदा नेत्रावती एक्सप्रेस संगमेश्वर रोड स्थानकात थांबली. येत्या २२ ऑगस्टला वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अनेक वर्षांच्या संगमेश्वरकरांच्या या मागणीसाठी आमदार शेखर निकम यांचे सहकार्य लाभले होते. तसेच संगमेश्वर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, मान्यवर, संगमेश्वर आणि देवरूख व्यापारी संघटना, रिक्षा चालक-मालक संघटना, प्रवासी वर्ग, चाकरमानी वर्ग व विविध गावाच्या ग्रामपंचायत, अनेक गावची गाव मंडळे, वाडी मंडळे, समाजसेवक, आरोग्य सेवक, पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणा यांचेही सहकार्य लाभले.
२२ ऑगस्ट रोजी नेत्रावती एक्सप्रेस “संगमेश्वर रोड थांबा” ला एक वर्ष पूर्ण होत आहे. हा वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात येणार असून आमदार शेखर निकम यावेळी उपस्थित राहणार असून त्याचबरोबर या सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व मान्यवर व संगमेश्वरवासीय जनता उपस्थित राहणार आहे, असे ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कळविले आहे.



